किशोरकुमार एक की अनेक असा कौतुकाने प्रश्न पडावा असे त्याचे अष्टपैलुत्व आहे. खुद्द त्याने निर्मित, दिग्दर्शित, अभिनित केलेल्या चित्रपटांच्या बाबतीत तर तो ‘सबकुछ’ म्हणूनच ओळखला गेला. पण त्याने आपला मोठा भाऊ अशोककुमार अर्थात दादामुनी यांनाही पार्श्वगायन करावे?
बेक़रार दिल, तू गाये जा
खुशियों से भरे वो तराने
जिन्हें सुन के दुनिया झूम उठे
और झूम उठे दिल दीवाने
बेक़रार दिल…
किशोरकुमार निर्मित- दिग्दर्शित- अभिनित इतकेच नव्हे तर संगीतबद्ध अशा ‘ दूर का राही ‘ ( १९७१) या गंभीर चित्रपटात अशोककुमार पियानोवर किशोरकुमारच्या आवाजात गातोय, शेजारीच दाढी वाढलेला किशोरकुमार बसलाय आणि हे दर्दभरे सूर ऐकून तनुजा आपल्या बेडरुममधून येथे येतेय.
राग हो कोई मिलन का, सुख से भरी सरगम का
युग-युग के बंधन का, साथ हो लाखों जनम का
ऐसे ही बहारें गाती रहें, और सजते रहे वीराने
जिन्हें सुन के …
गीतकार ए. इर्शादच्या या अतिशय भावपूर्ण गीताला किशोरकुमारच्या तरल संगीताने छान खुलवलयं. ‘अभिनेता’ किशोरकुमार केवळ गंमत्या ( उदा. पडोसन) असतो असे नाही तर तो खूप गंभीरदेखिल असतो याचा अत्यंत प्रभावी प्रत्यय या गाण्याने दिला आणि त्याचे चाहते विलक्षण सुखावले. पण तेव्हाच एक प्रश्न होता, याच गाण्यातील त्याच्यासोबतची गायिका कोण?
रात यूँ ही थम जायेगी, रुत ये हंसीं मुसकाएगी
बंधी कली खिल जायेगी, और शबनम शरमायेगी
प्यार के वो कैसे नगमे, जो बन जायें अफ़साने
जिन्हें सुन के …
ही नवीन पार्श्वगायिका होती, सुलक्षणा पंडित. काही काळातच ती गायिका व नायिका अशा दोन्ही रुपात हिंदी चित्रपटसृष्टीत वावरु लागली. तिचा सूर तनुजाने आपल्या अभिनयात पुरेपूर पकडलाय. चित्रपट कृष्ण धवल अर्थात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ असल्याने या गाण्यातील गांभीर्य (आणि गूढताही?) अधिकच भावते.
दर्द में डूबी धुन हो, सीने में इक सुलगन हो
सांसों में हलकी चुभन हो, सहमी हुई धड़कन हो
दोहराते रहें बस गीत ये आ, दुनिया से रहें बेगाने
जिन्हें सुन के …
तनुजा एकदम फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि माळरानावर मोकळेपणाने प्रसन्नपणे धावताना दिसते. संगीतकार किशोरकुमारने कडव्यांमधील संगीतावर हॅपी मूड छान साकारलाय. आपण आनंदाचे गीत गाऊयात. आणि उदासिनतेमधून बाहेर येऊयात हे खूप गंभीरतेने सांगणारे हे गाणे ऐकून आपण जसे भावुक होतो तसेच फ्रेशही होतो. किशोरकुमारच्या सर्वोत्तम गाण्यातील हे एक आहेच पण पडद्यावर ते अशोककुमार गातो हेही एक वैशिष्ट्य.
दिलीप ठाकूर