अभिनेता सुनील शेट्टी व माना यांच्या आंतरधर्मीय लग्नाची ९० च्या दशकात खूप चर्चा झाली होती. सुनील व माना यांची धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांकडून विरोध सहन झाला होता. पण दोघेही लग्नाच्या निर्णयावर ठाम होते. शेवटी दोघांच्याही कुटुंबियांना त्यांचा निर्णय मान्य करावा लागला होता.

“ती पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर होती,” असं सुनील पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मानाबद्दल म्हणाला. “माझ्या आई-वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुमचं लग्न होणार नाही. तुम्ही लग्न करूच शकत नाही. ती वेगळ्या धर्माची होती, पण तिने कधीही असा विचार केला नाही. ती नेहमी मला म्हणायची, ‘जोपर्यंत मी तुला तुझ्या आयुष्याचा भाग म्हणून हवी आहे, तोपर्यंत मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन.’ मी ते कसे विसरू शकतो?” असं सुनीलने सांगितलं.

अनेकांनी लग्न न करण्याचा सल्ला दिला – सुनील शेट्टी

सुनील शेट्टीने त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मानाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. “जेव्हा मला माझा पहिला चित्रपट मिळाला तेव्हा आम्ही लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आम्ही लग्न केलं. मी लग्न केलं तर माझा चाहतावर्ग कमी होईल, खासकरून महिला चाहत्यांचं प्रमाण कमी होईल असं मला सर्वजण सांगत होते. अनेकांनी मी लग्न करू नये असं सुचवलं; पण मी माझा निर्णय घेतला होता,” असं सुनील शेट्टी म्हणाला.

मी अपयशी झालो तरीही ती मला…

लग्नाच्या निर्णयावर का ठाम राहिला? याबद्दल सुनील म्हणाला, “जेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता ती तुम्हाला पत्नीच्या दृष्टिकोनातून सर्वात असुरक्षित इंडस्ट्रीत काम करू देते, तेव्हा तिचा आदर करणं ही तुमची जबाबदारी असते. मी नेहमीच माझ्या निर्णयांबद्दल स्पष्ट राहिलो आहे. आणि मला माहित होतं की मी अपयशी झालो तरीही ती मला कधीही सोडणार नाही. हो, जर माझं वागणं चुकीचं असेल किंवा मी वचनबद्ध नसेन तर ती नक्कीच सोडून जाईल. कारण मानामध्ये तो स्वाभिमान तेव्हाही होता आणि आजही आहे.”

सुनील शेट्टीने त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं. “जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा लग्न एक वचनबद्धता होती. सात फेरे घेऊन सात जन्म एकमेकांसोबत राहू असं वचन द्यायचो. आता हे फिल्मी डायलॉग वाटत असले तरी हेच खरं आहे. जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा तुम्हाला कळतं की चांगल्या पत्नीमुळे तुमचे आयुष्य संतुलित राहते,” असं सुनील शेट्टी म्हणाला.

मी पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडलो होतो – सुनील शेट्टी

मानाला पाहताच तिच्या प्रेमात पडल्याची कबुली सुनील शेट्टीने एका मुलाखतीत दिली होती. “मी तिला पाहता क्षणीच प्रेमात पडलो होतो. त्यावेळी माझे केस लांब होते, माझ्याकडे एक बाईक होती आणि माझी शरीरयष्टी अशी होती की सगळे मला गुंड म्हणायचे. माझ्याभोवती नेहमीच मुलींचा गराडा असायचा,” असं सुनीलने म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानाला भेटण्याबद्दल सुनील म्हणाला, “मी ख्रिसमस आणि नवीन वर्षाला पहाटे चार वाजता मानाला भेटायचो, पण ती एकदाही तक्रार करायची नाही. आम्ही भेटलो तेव्हापासून ती मला खूप प्रेमळ व काळजी घेणारी वाटायची. एक वर्ष, २, ३, चार वर्षे असं करता करता तब्बल ९ वर्षे माझे आई-वडील नकार देत राहिले. पण तिच्या आई-वडिलांचा मात्र माझ्यावर जीव होता. तिच्या आईशी माझा छान बाँड होता.” ९ वर्षे नात्यात राहिल्यानंतर सुनील व माना यांनी २५ डिसेंबर १९९१ रोजी लग्न केलं होतं. त्यांना १९९२ मध्ये मुलगी अथिया झाली आणि नंतर १९९६ मध्ये अहानचा जन्म झाला.