‘मिर्झापूर’ सीरिजमुळे अभिनेता विक्रांत मेस्सी घराघरांत लोकप्रिय झाला. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या त्याच्या ’12th Fail’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉलीवूड इंडस्ट्रीत कोणाचंही पाठबळ नसताना त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग, नेपोटिझम यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. यातील बरेच कलाकार विक्रांत मेस्सीचे जवळचे मित्र होते. या घटनांचा वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, “सुशांतच्या जाण्याचं मला सर्वात जास्त दु:ख झालं. आम्ही दोघांनाही छोट्या पडद्यावर एकत्र पदार्पण केलं होतं. तेव्हा तो ‘पवित्र रिश्ता’मध्ये काम करायचा आणि मी ‘बालिका वधू’ ही मालिका करत होतो. या दोन्ही मालिका त्यावेळी लोकप्रिय होत्या. तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखत असल्याने सुशांतच्या निधनानंतर मला प्रचंड वाईट वाटलं होतं.”

हेही वाचा : ‘बाजीराव मस्तानी’ भयंकर चित्रपट आहे, असं पेशव्यांच्या वंशजांना का वाटतं? जाणून घ्या

विक्रांत पुढे म्हणाला, “सुशांतच्या निधनानंतर झालेले आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरच्या चर्चा, काही बातम्यांमधून करण्यात आलेली दिशाभूल या गोष्टी एकदम चुकीच्या होत्या. या लोकांना नेमकं काय साध्य करायचं होतं हे मला समजलंच नाही. तो गेल्यावर १५ दिवस त्या प्रकरणाची काही लोकांकडून फक्त चेष्टा करण्यात आली. तो सगळा प्रकार पाहून मला खरंच दु:ख झालं.”

हेही वाचा : ‘एकापेक्षा एक’ फेम अभिनेत्री सुकन्या काळणचा पार पडला साखरपुडा, कुशल बद्रिकेची पत्नीसह हजेरी, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी मौन बाळगलं. यामुळेच बॉलीवूड इंडस्ट्री एक कुटुंब आहे असं मी कधीच म्हणणार नाही… हे एक कुटुंब अजिबात नाही. हा फक्त एक समूह आहे. आपल्या बालपणीचं उदाहरण पाहिलं तर ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ यांसारख्या मोहिमा आपल्याला आता पाहायला मिळत नाही. आजही अशाचप्रकारे एकजूट होऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पण, काही लोक घाबरतात. अलीकडच्या काळात जे कलाकार बोलतात ते फसतात आणि जे बोलत नाहीत त्यांनाही नावं ठेवली जातात. मग नेमकं काय करायचं? सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं असेल, तर काही सुशिक्षित लोक सुद्धा कलाकारांना सर्रास ट्रोल करतात. एवढं शिक्षण घेतल्यानंतरही त्यांची मानसिकता तशीच असते. त्यामुळे अनेक विषयांवर व्यक्त होण्याची इच्छा असूनही तेवढं मनमोकळेपणाने बोलता नाही.” असं विक्रांत मेस्सीने सांगितलं.