Abhishek Bachchan Talks About Amitabh Bachchan : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या ‘कालीधर लापता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बच्चन त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याचे वडील व लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन देखील अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतात. परंतु, असे असले तरी अभिषेक बच्चनने एका मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांना टेक्नॉलॉजीबद्दल फार माहिती नाहीये, असे म्हटले आहे.

अभिषेकने कपिल शर्माच्या कार्यक्रमात या संदर्भातील एक किस्सा सांगितला आहे. अभिषेक म्हणाला, “आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आम्ही आई-बाबांना सांगून ठेवलं आहे की, तुम्हाला काही बोलायचं असेल, मेसेज करायचा असेल, तर या ग्रुपवर करीत जा. त्यामुळे माझ्या आईने एकदा ती बाहेरगावी जात असताना फ्लाईट सुरू होण्याआधी बोर्डेड द फ्लाइट, असा मेसेज टाकला आणि पोहोचल्यानंतरही मेसेज करीत कळवले. ती तिकडे पोहोचली, घरी गेली, जेवली आणि झोपलीसुद्धा असेल तेव्हा माझ्या बाबांनी तिला मेसेज करीत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या”.

अभिषेक पुढे याबाबत सांगताना म्हणाला, “तेव्हा मी त्यांना सांगितलं की, बाबा आता ती झोपलीपण असेल. मेसेजला रिप्लाय इतक्या उशिरा नाही द्यायचा. जेव्हा मेसेज येतो, तेव्हाच त्याला रिप्लाय द्यायचा असतो”. अभिषेकने यादरम्यान अमिताभ यांच्याबद्दलचा अजून एक किस्सा सांगितला आहे.

अभिषेक वडिलांबद्दल म्हणाला, “माझे वडील कधीच फोन उचलत नाहीत. जर मला कधी त्यांच्याशी फोनवर बोलायचं असेल, तर ते म्हणतात. आधी मला एसएमएस कर की, तुला मला कॉल करायचा आहे. पण माझं असं मत आहे की, फोन करण्यात अर्थ काय; जर मेसेजवरच बोलायचं असेल तर. ते कधीच कोणाचाही फोन उचलत नाहीत. त्यांचा फोन नेहमी सायलेटवर असतो”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिषेकबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘कालीधर लापता’ या चित्रपटातून झळकणार आहे. येत्या ४ जुलैला त्याचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यासह तो नुकताच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून झळकला होता. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.