Mrunal Thakur breaks silence on dating Dhanush : मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मृणाल घटस्फोटित दाक्षिणात्य अभिनेता धनुषला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांचा एका पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ते एकमेकांचे हात हातात घेऊन दिसत होते. अखेर मृणालने या डेटिंगच्या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे.
मृणाल ठाकूर व धनुष दोघांच्या डेटिंगच्या अफवा ‘सन ऑफ सरदार २’च्या इव्हेंटपासून सुरू झाल्या होत्या. या इव्हेंटला त्याने हजेरी लावली होती. नंतर धनुष मृणालच्या वाढदिवसाच्या पार्टीतही उपस्थित होता. दोघे एकमेकांचे हात हातात घेऊन हसत बोलताना कॅमेऱ्यात कैद झाले होते.
इतकंच नाही तर मृणाल ठाकूर धनुषच्या बहिणी डॉ. कार्तिका कार्तिक आणि विमला गीता यांना सोशल मीडियावर फॉलो करते. त्यामुळे या चर्चा खऱ्या असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. अखेर मृणालनेच या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.
धनुषबद्दल मृणाल म्हणाली…
ओन्ली कॉलीवूडच्या एका रिपोर्टनुसार, मृणालने धनुषबरोबरच्या अफेअरच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. तिला व धनुषला या अफवा मजेशीर वाटल्या. धनुष फक्त चांगला मित्र आहे. अजय देवगणने त्याला ‘सन ऑफ सरदार 2’च्या प्रिमियरला आमंत्रित केलं होतं, असंही मृणालने सांगितलं.
“धनुष आणि मी चांगले मित्र आहोत. माझ्या व त्याच्या लिंक-अपच्या अनेक बातम्या येत आहेत. मी त्या पाहिल्या. त्या खूप मजेशीर होत्या. धनुषने ‘सन ऑफ सरदार २’ च्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कोणीही गैरसमज करू नये. त्याला अजय देवगणने आमंत्रित केलं होतं,” असं मृणाल ठाकूर म्हणाली.
दरम्यान, सर्वात आधी News18 ने धनुष व मृणाल यांच्या अफेअरचं वृत्त दिलं होतं. तसेच सूत्रांच्या हवाल्याने दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं होतं. “दोघेही डेट करत आहेत, हे खरं आहे. पण त्यांचं नातं खूपच नवीन आहे, त्यामुळे आता त्यांना ते सार्वजनिक करायचं नाही. ते बाहेर फिरायला जाणार आहेत. त्यांच्या मित्रांना त्यांच्या नात्याबद्दल माहित आहे,” असं सूत्राच्या हवाल्याने म्हटलं होतं. पण आता खुद्द मृणालनेच या अफवांवर प्रतिक्रिया देत हे सगळं खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मृणाल ठाकूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटात अजय देवगणबरोबर झळकली होती. या चित्रपटात नीरू बाजवा, रवी किशन हे कलाकार आहेत. हा चित्रपट सध्या थिएटर्समध्ये सुरू आहे.