प्रसिद्ध गीतकार लेखक आणि सलीम जावेद जोडीतले लोकप्रिय लेखक जावेद अख्तर यांचं व्यक्तिगत आयुष्य हे कायमच चर्चेचा विषय ठरलं आहे. पहिली पत्नी असताना आणि दोन मुलं असताना शबाना आझमी यांच्याशी जावेद अख्तर यांनी लग्न केलं. आता ही बाब ऐकायला फार विशेष वाटत नसली तरीही त्या काळी हा धाडसी निर्णय होता. शबाना आझमी या नात्याबाबत तसंच जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणींबाबत बोलल्या आहेत. त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

शबाना आझमी आणि जावेद यांचं १९८४ मध्ये लग्न

१९७२ मध्ये हनी इराणी आणि जावेद अख्तर यांचं लग्न झालं. १३ वर्षांनी म्हणजेच १९८५ मध्ये हे दोघंही विभक्त झाले. १९८४ मध्ये शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचं लग्न झालं होतं. अभिनेता अरबाझ खानच्या the invincibles या चॅट शोमध्ये शबाना आझमी जावेद अख्तर यांच्याबाबत तसंच त्यांची पहिली पत्नी हनी इराणींबाबत बोलल्या आहेत. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची प्रेमकहाणी तर सर्वश्रुत आहे. मात्र हनी इराणींबाबत त्यांनी इतक्या वर्षांत पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे. जावेद अख्तर यांच्या दारुचं व्यसन लागलं होतं त्याबद्दलही त्या बोलल्या आहेत.

शबाना आझमी नेमकं काय म्हणाल्या?

शबाना आझमी यांना सिनेमासृष्टीत ५० वर्षे झाली आहेत. पाच दशकांची त्यांची कारकीर्द समांतर सिनेमापासून सुरु झाली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मी समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही सिनेमांमध्ये काम करत होते. फकिरा सिनेमा हिट झाला त्यानंतर आत्तापर्यंत माझी वाटचाल सुरु आहे. लहानपणी माझ्या कम्युनिस्ट पक्षांचे संस्कार झाले. कारण माझे वडील कम्युनिस्ट विचारांचे होते. मला आयुष्याची मूल्यं समजली. माझ्यातल्या चळवळकर्तीची मूळं कदाचित माझ्या लहानपणातच लढली होती. मला आठवतं आहे मी महापालिकेच्या शाळेत होते तेव्हा मला ती शाळा आवडली नाही म्हणून मी पेपरमध्ये काहीही लिहिलं नाही. त्यानंतर मला इंग्रजी शाळेत घालण्यात आलं अशी आठवणही शबाना आझमी यांनी सांगितलं.

हनी इराणींबाबत काय म्हणाल्या शबाना आझमी?

“मी आज खूप खुश आहे, कारण माझं झोया आणि फरहानबरोबरचं नातं खूप चांगलं आहे. या सगळ्याचं श्रेय हनीला (जावेद अख्तर यांची पहिली पत्नी) देते. मी आणि जावेद यांनी लग्न केलं तेव्हा झोया आणि फरहान खूप लहान होते. त्या दोघांना आपल्या बरोबर घेऊन जाणं हनीसाठी खूप सोपं होतं. पण हनी तसं वागली नाही तसंच तिने माझ्याबाबत कधीही मुलांच्या मनात विष कालवलं नाही. उलट आमच्या बरोबर राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. मी हनीला यासाठी खूप मानते याचं कारण हा सगळा तिचा मोठेपणा आहे. हनीचं आणि माझं नातं आजही खूप चांगलं आहे. आजही तिला कोणतीही मदत लागली तर ती विश्वासाने जावेदना फोन करते. ते देखील तिच्या मदतीला धावून जातात. आमचं नातं खूप चांगलं आहे.” असं शबाना आझमी यांनी द इन्विन्सिबल्स या चॅट शो मध्ये म्हणाल्या.

हनीच्या मनात सुरुवातीला कटुता होती

शबाना आझमी पुढे म्हणाल्या, “हनी आणि जावेद यांचा घटस्फोट झाला त्यावेळी तिच्या मनात सुरुवातीला कटुता होतीच. ते अतिशय नैसर्गिक आहे. तिच्या मनात नाकारलं गेल्याची भावना होती. पण जावेद अख्तर यांनी सांभाळून घेतलं. या सर्वांतून आमच्या कुटुंबात जे नातं आहे ते बहरलं आहे.” असं शबाना आझमी म्हणाल्या.

हे पण वाचा- “त्याच्यामध्ये मला माझ्या वडिलांची प्रतिमा दिसली”, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या प्रेमकहाणीची ‘अशी’ झालेली सुरुवात

अर्थ सिनेमाचा शेवट बदलायला सांगितला होता

“अर्थ हा सिनेमा जेव्हा रिलिज झाला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की सिनेमा चांगला आहे पण सिनेमाचा शेवट बदला. कारण भारतात हे होऊच शकत नाही की पुरुष स्त्रीची माफी मागतो आहे आणि ती त्याला माफ करत नाही. मात्र आम्ही ठाम राहिलो. महेश भट्ट यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आमच्याशी चर्चा केली तसंच त्यांनी शेवट बदलला नाही. अर्थ सिनेमाने त्या काळात क्रांती घडवली.” असंही शबाना आझमींनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जावेद अख्तर यांच्या व्यसनाबद्दल काय म्हणाल्या?

“जावेद अख्तर यांना दारुचं व्यसन लागलं होतं. मात्र त्यांनी निग्रह करुन त्यांनी ते व्यसन सोडलं. या व्यसनाच्या ते खूप आहारी गेले होते. मात्र आम्ही अमेरिकेत एका फ्लॅटमध्ये होतो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की शबाना आजपासून मी दारु सोडली आणि त्या दिवसानंतर त्यांनी निग्रह करुन दारुचं व्यसन सोडलं. हे खरंच त्यांचं श्रेय आहे.” असंही शबाना आझमी म्हणाल्या.