अभिनेत्री अलका कुबल यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या विशेषतः स्त्रियांच्या मनावर वेगळीच छाप पाडली. मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. ९० च्या काळात असंख्य मराठी चित्रपटांमध्ये मुलीच्या, सूनेच्या अशा भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची सोज्वळ, साधी, भोळी अभिनेत्री अशी ओळख निर्माण झाली. परंतु, एकावेळेनंतर साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकल्यामुळे कलाकार त्यांची वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचं सांगतात.
अलका कुबल यांनीदेखील नुकतंच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलखतीत याबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी यामध्ये म्हटलं आहे, “मला वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची इच्छा आहे, खलनायिकेची भूमिका साकारायला आवडेल. रडूबाईची भूमिका साकारून कंटाळा आला आहे.” पुढे त्यांनी त्यांच्या साध्या भोळ्या दिसण्यामुळे हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी हुकल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी विचारणा झाली होती. चित्रपटाच्या निर्मिती संस्थेकडून मला जवळपास २० दिवस फोन येत होते, त्यामुळे मी सुद्धा जसा मला वेळ मिळाला तशी त्यांना भेटण्यासाठी गेले.”
“संजय लीला भन्साळी यांना भेटले. तासभर आम्ही गप्पा मारल्या, पण मला बघताच त्यांनी “अलका तू खूप साधी भोळी दिसतेस” असं म्हटलं. या चित्रपटात तनवी आझमी यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली होती. परंतु, ती भूमिका साकारण्याची संधी हुकली. पण, संजय भन्साळी यांच्यासह निदान एक तासभर गप्पा मारता आल्याचं समाधान आहे.”
सध्या अलका कुबल त्यांच्या ‘वजनदार’ या नाटकाचं प्रमोशन करत आहेत. या दरम्यान त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रातील त्यांच्या एकूण प्रवासाला उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी अनेक आठवणीदेखील सांगितल्या आहेत. ‘वजनदार’ या नाटकातून अलका कुबल अनेक वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. मुलाखतीत त्यांनी पूर्वी त्या चित्रपटांमुळे खूप व्यस्त असल्याने त्यांना कधी नाटकात काम करता आलं नसल्याचं म्हटलं आहे.
परंतु, आता नाटासाठी पुरेसा वेळ देऊ शकत असल्याने रंगभूमीवर परतण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘वजनदार’ या नाटकामध्ये त्यांच्यासह ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.