रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. रणबीर, रश्मिका अन् बॉबीसह या चित्रपटातील तृप्ती डीमरीचीही चांगलीच चर्चा आहे. शिवाय यामध्ये रणबीरच्या मेव्हण्याची भूमिका निभावणाऱ्या सिद्धांत कर्णिकचं काम लोकांना पसंत पडलं आहे.

नुकतंच सिद्धांतने चित्रपटावर होणाऱ्या टिकेवर आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर होणाऱ्या टिकेवर भाष्य केलं आहे. सिद्धार्थ कन्नन या युट्यूबरशी संवाद साधतांना संदीप रेड्डी वांगा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि एकूणच संघर्षाबद्दल त्याने खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर संदीप यांच्या घरच्यांनीही त्यांना कसा पाठिंबा दिला याबद्दलही त्याने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’ व ‘सॅम बहादुर’मुळे मनोज बाजपेयींच्या ‘जोरम’चे नुकसान; उद्विग्न होत अभिनेता म्हणाला, “हा दृष्टिकोन…”

सिद्धांत म्हणाला, “आपण त्यांच्या चित्रपटांबद्दल बोललो आहोत, पण मला त्यांच्या आयुष्याबद्दल भाष्य करायचं आहे. याबद्दल फारसं कुणालाच ठाऊक नाही. त्यांच्या भावाने मला काही गोष्टी सांगितल्या. जेव्हा संदीप यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं त्यावेळी त्यांना फारसं काम मिळत नव्हतं. अखेर त्यांनी मित्रांबरोबर एक कंपनी सुरू केली, पण अगदी महिन्याच्या आधीच त्यात पैसे गुंतवणाऱ्याने त्यातून काढता पाय घेतला. तेव्हा संदीप यांना १.६ कोटींची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांचे कुटुंब एकत्र आले, त्यांनी त्यांच्या पूर्वजांची ३६ एकर आंब्याची शेती विकली अन् संदीप यांना चित्रपट बनवण्यासाठी मदत केली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सिद्धांत म्हणाला, “संदीप यांचा भाऊ प्रणय जो अमेरिकेत आयटीमध्ये नोकरी करत होता, तोदेखील ती नोकरी सोडून इथे आला. मी कधीच माझे पैसे अशाप्रकारे कोणालाही द्यायची हिंमत करू शकत नाही, पण त्यांचं कुटुंब एकत्र आलं, त्यांनी पैसे दिले, ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट तयार झाला, सुपरहीट झाला. संदीप यांचा दूसरा चित्रपट ‘कबीर सिंग’सुद्धा हीट ठरला. १०० कोटींच्या वर त्याने कमाई केली. तिसरा चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ने ८०० कोटींची कमाई केली. त्यांचा पुढचा चित्रपट प्रभासबरोबर आहे. संदीप यांचं करिअर आणि आयुष्य यावर नजर टाकलं तर आपल्या लक्षात येईल की हा मार्ग निवडायलाही धाडस लागतं. त्यांच्या कुटुंबाकडून मला खूप काही शिकायला मिळालं.”