दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांनी यशाच्या शिखरावर असताना १९७३ मध्ये अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले होते. पण १९८० पासून ते वेगळे राहू लागले. मात्र, त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. राजेश खन्ना यांचे डिंपल व्यतिरिक्त अभिनेत्री अनिता अडवाणीशी संबंध होते. मेरी सहेलीला दिलेल्या मुलाखतीत, अनिताने खुलासा केला की ती व राजेश खन्ना फक्त नात्यात नव्हते, तर त्यांनी लग्नही केले होते.
“आम्ही खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. पण चित्रपटसृष्टीत कोणीही अशा गोष्टींबद्दल उघडपणे बोलत नाही. सगळे म्हणतात की ‘आम्ही मित्र आहोत’ किंवा ‘आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत’ किंवा इतर काही. पण मीडियात आधीच बातमी आली होती की आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे आमच्यापैकी कोणालाही आम्ही लग्न केलंय आहे हे जाहीर करण्याची गरज कधीच वाटली नाही,” असं अनीता म्हणाली.
मंदिरात लग्न केल्याचा दावा
हा खासगी सोहळा कुठे झाला होता? असं विचारल्यावर ती म्हणाली, “आमच्या घरी एक लहान मंदिर होते. मी काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र बनवून घेतले होते. त्यांनी ते माझ्या गळ्यात घातले. माझ्या भांगेत कुंकू भरले आणि म्हणाले, ‘आजपासून तू माझी जबाबदारी आहेस.’ अशा रितीने एका रात्री आमचे लग्न झाले होते.”
राजेश खन्ना डिंपल कपाडियांना भेटण्यापूर्वी आपण नात्यात होतो, असा दावा अनिताने केला. “हो, मी डिंपल कपाडियांच्या आधी त्यांच्या आयुष्यात आले होतो. पण त्यावेळी आम्ही लग्न केलं नाही, कारण मी खूप लहान होते. मग मी जयपूरला परत गेले होते,” असं ती म्हणाली. राजेश खन्नांच्या इतक्या जवळ असूनही तिला त्यांच्या अंत्यसंस्कारात जाता आलं नव्हतं. तसेच त्यांच्या प्रार्थनासभेत जाण्यापासून अडवण्यात आलं होतं, असंही तिने सांगितलं.
प्रार्थनासभेत जाऊ दिलं नव्हतं
“मी आत जाऊ नये यासाठी तिथे बाउन्सर ठेवले होते, हे मला मित्रांकडून कळले. मी आत जाणार, असं सांगितल्यावर त्यांनी मला न जाण्याची ताकीद दिली. मी स्तब्ध झाले आणि विचारलं, ‘हे सर्व का करताय?’ माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला कॅमेरा घेऊन जाण्यास सांगितलं, तसेच ते काय करतात ते रेकॉर्ड करण्याचा सल्लाही दिला. पण इतक्या पवित्र दिवशी मी असं कसं करू शकते? हा विचार केला आणि गेले नाही. शेवटी मी मंदिरात एकटीने त्यांच्यासाठी विधी केला,” असं अनिता म्हणाली.

दरम्यान, अनिता अडवाणी व राजेश खन्ना यांच्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. अंत्यसंस्काराच्या वेळी अनिता यांनी राजेश खन्नांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं जातं. तसेच २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं, तेव्हापर्यंत त्यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही तिने केला होता.
अनिताने म्हटलं होतं की ती त्यांचे घर, आशीर्वाद बंगला सांभाळत होती. त्यांची राजेश खन्नांची प्रकृती बिघडल्यावर त्यांची काळजी घेत होती. करवा चौथचा उपवास त्यांच्यासाठी ठेवल्याचं तिने सांगितलं होतं. राजेश खन्नांच्या निधनानंतर, अनिता अडवाणीने त्यांच्या कुटुंबाविरुद्ध कायदेशीर खटला दाखल केला आणि दिवंगत अभिनेत्याबरोबरच्या नात्याला औपचारिक मान्यता मिळावी अशी मागणी केली होती. पण राजेश खन्ना यांनी डिंपलला घटस्फोट दिला नव्हता, त्यामुळे ते अनिताशी कायदेशीररित्या लग्न करू शकले नव्हते, असं म्हटलं जातं.