दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी यांचं नातं सर्वश्रुत आहे. डिंपल कपाडियांच्या आधी आपण राजेश यांच्या आयुष्यात आल्याचा दावा अनिताने केला. राजेश व डिंपल यांचं लग्न झाल्यानंतर अनिता व राजेश काही वर्षांसाठी दुरावले. पण डिंपल व राजेश वेगळे राहू लागल्यानंतर काही वर्षांनी अनिता पुन्हा राजेश खन्ना यांच्या आयुष्यात आली.

“मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी किशोरवयीन होते. खूप कमी वयातच आमची प्रेमकहाणी सुरू झाली होती. त्यांचा माझ्या हृदयावर आणि मनावर इतका खोलवरचा प्रभाव पडला की मला नंतर कधीच कोणीही आवडलं नाही. मग नियतीने आपलं काम केलं, आम्ही कुठे ना कुठे एकमेकांना भेटत राहिलो. आणि शेवटी, जेव्हा सगळेच त्यांना सोडून गेले आणि त्यांच्याबरोबर कुटुंबातलं कोणीही नव्हतं, तेव्हा आम्ही पुन्हा एकत्र आलो. त्यानंतर, आम्ही तब्बल १२ वर्षे एकत्र राहिलो,” असं अनिता म्हणाली.

लोक मला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करायचे, पण…

राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या नात्यातील सुरुवातीच्या टप्प्यात भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित होते, असं अनिता अडवाणीने कबुल केलं. “ते खूप चांगले होते, ते लाखात एक होते. पण गोष्ट अशी आहे की, मी खूप कमी वयातच त्यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. मी एका रूढीवादी कुटुंबात मोठी झाले, त्यामुळे राजेश खन्ना यांनाच मी माझे सर्वस्व समजायचे. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा लोक मला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करायचे, पण मला मात्र दुसरं कोणीच दिसत नव्हतं. मी तुलना करायचे. मी अडकले होते. दुसऱ्या पुरुषाने मला स्पर्श केल्याची कल्पनाही मी करू शकत नव्हते. हा माझ्यासाठी एक मानसिक अडथळा ठरला,” असं अनिता म्हणाली.

राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रार्थनासभेत जाऊ दिलं नव्हतं, असं अनिताने सांगितलं. राजेश खन्नांच्या इतक्या जवळ असूनही तिला त्यांच्या अंत्यसंस्कारात जाता आलं नव्हतं. तसेच त्यांच्या प्रार्थनासभेत जाण्यापासून अडवण्यात आलं होतं.

“मी आत जाऊ नये यासाठी तिथे बाउन्सर ठेवले होते, हे मला मित्रांकडून कळले. मी आत जाणार, असं सांगितल्यावर त्यांनी मला न जाण्याची ताकीद दिली. मी स्तब्ध झाले आणि विचारलं, ‘हे सर्व का करताय?’ माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला कॅमेरा घेऊन जाण्यास सांगितलं, तसेच ते काय करतात ते रेकॉर्ड करण्याचा सल्लाही दिला. पण इतक्या पवित्र दिवशी मी असं कसं करू शकते? हा विचार केला आणि गेले नाही. शेवटी मी मंदिरात एकटीने त्यांच्यासाठी विधी केला,” असं अनिता मुलाखतीत म्हणाली.