अनुपम खेर व किरण खेर यांनी १९८५ मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी ते जवळपास एक दशकाहून जास्त काळ चांगले मित्र होते. किरण यांचं गौतम बेरीशी लग्न झालं होतं आणि लग्नात अडचणी असल्याने त्याच कठीण काळातून जात होत्या. दुसरीकडे अनुपम यांचेही ब्रेकअप झाले होते. याच काळात दोघेही प्रेमात पडले आणि एकमेकांशी लग्न केले.
किरण खेर यांना पहिल्या लग्नापासून मुलगा होता. त्याचं नाव सिकंदर. किरण यांच्याशी लग्न केल्यावर सिकंदर अनुपम यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. त्यांना त्याला आपले नाव दिले. आता लग्नानंतर ४० वर्षांनी अनुपम खेर यांनी स्वतःचे मूल नसल्याची पोकळी जाणवते, असं वक्तव्य केलं आहे. किरण व अनुपम यांना स्वतःची मुलं का झाली नाहीत? असं विचारण्यात आलं. त्यावर “किरण गरोदर राहू शकली नाही” असं ते म्हणाले.
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर लहान मूल मोठं होताना पाहता आलं नाही, याबद्दल काय वाटतं असं विचारण्यात आलं. अनुपम म्हणाले की त्यांना आधी याबद्दल काही वाटायचं नाही, पण जेव्हा ते ६० वर्षांचे झाले तेव्हा त्याबद्दल विचार करू लागले. “मी मुलांबरोबर खूप काम करतो. माझे फाउंडेशन खूप काम करते. मला मुलांची आवड आहे. मी ‘से ना समथिंग टू अनुपम अंकल’ नावाचा एक शो करायचो जो मुलांचा शो होता,” असं अनुपम खेर म्हणाले.
सिकंदर ४ वर्षांचा होता तेव्हा आयुष्यात आला – अनुपम खेर
मूल होऊ न देण्याचा निर्णय का घेतला, असं अनुपम यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “किरण गरोदर राहू शकली नाही. नंतर ती गरोदर राहिली, पण त्यावेळी गर्भाची वाढ योग्य पद्धतीने होत नव्हती.” अनुपम त्यावेळी त्यांच्या करिअरमध्ये व्यग्र होते. “मी खूप मोठे प्रोजेक्ट करण्यात व्यग्र होतो. मी खूपच व्यग्र होतो आणि सिकंदर चांगला आहे, माझ्यासाठी सिकंदर खूप चांगला आहे. तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा ४ वर्षांचा होता, मी किरणशी लग्न केल्यावर मला कधीही कशाचीही कमतरता जाणवली नाही,” असं अनुपम खेर म्हणाले.
मूल नसण्याबद्दल यापूर्वीही अनुपम खेर व्यक्त झाले होते. शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, “मी सिकंदरवर खूश नाही, असं नाही; पण मला वाटते की मुलांना मोठं होताना पाहणं आनंद देणारं असतं. हे खरंच एक प्रामाणिक उत्तर आहे. खरं तर मी याचं उत्तर देणं टाळू शकलो असतो, पण मला तसं करायचं नाही. ठिक आहे. ही माझ्या आयुष्यातील ही शोकांतिका नाही. पण, मला कधीकधी वाटतं की माझं बाळ असतं तर ती एक चांगली गोष्ट असती.”