Athiya Shetty Quit Bollywood : बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टींची मुलगी अथिया शेट्टीला दोन महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं. अथियाने २४ मार्च, २०२५ रोजी मुलीला जन्म दिला. याबाबतची माहिती केएल राहुल आणि अथियाने सोशल मीडियावरुन दिली. त्यानंतर आता अभिनेत्रीबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अथियाने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अथियाचे वडील म्हणजेच सुनील शेट्टी यांनी स्वत: खुलासा केला आहे.
सुनील शेट्टी यांनी आपल्या अभिनयाद्वारे इंडस्ट्रीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची दोन्ही मुलं म्हणजेच अथिया आणि अहान यांनीसुद्धा या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. मात्र आई झाल्यानंतर वयाच्या ३२ व्या वर्षी अथियाने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंकव्हिलाशी बोलताना सुनील शेट्टींनी स्वत: याबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी या क्षेत्रात मुलगी अथियाला तिचे करिअर सुरू ठेवण्यात रस नाही. या सगळ्यापासून ती दूर राहण्यास तिला सोयीस्कर वाटतं. तसंच अभिनय क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय तिने स्वतःहून घेतल्याचंही सुनील शेट्टींनी सांगितलं. सुनील शेट्टींच्या मते, अथियाला तिच्या शेवटच्या चित्रपटानंतर काही चित्रपटांबद्दल विचारणा झाली. परंतु तिने कोणताही चित्रपट स्वीकारला नाही.
याबद्दल सुनील शेट्टी म्हणाले, “मुलगी अथियाने मला सांगितले, ‘बाबा, मला यापुढे चित्रपटांत काम करायचं नाही.’ आणि निघून गेली. तिच्या या निर्णयाचा मी आदर करतो. तिने इतरांचं न ऐकता स्वतःच्या मनाचं ऐकलं ही चांगली गोष्ट आहे. तिला तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका मिळाली आहे. आणि ती म्हणजे आईची भूमिका. तिला ती भूमिका खूप आवडते.”
दरम्यान, अथियाने २०१५ मध्ये सलमान खानच्या प्रोडक्शनच्या ‘हिरो’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटातून सूरज पंचोलीनेही पदार्पण केले होते. त्यानंतर तिने फक्त दोन चित्रपट केले. त्यापैकी एक म्हणजे ‘मुबारकां’ आणि दुसरा ‘मोतीचूर चकनाचूर’. अथियाच्या या तिन्ही चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर ‘नवाबजादे’ चित्रपटातील एका गाण्यातही तिने खास भूमिका साकारली आहे.
अथिया शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, तिने क्रिकेटर केएल राहुलबरोबर २३ जानेवारी २०२३ मध्ये लग्न केलं. त्यानंतर याचवर्षी २४ मार्च रोजी त्यांनी आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले. दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं असून त्यांनी आपल्या लेकीचं नांव ‘इवारा’ असं ठेवलं आहे. याच ‘इवारा’साठी अथिया आता पुढे अभिनय क्षेत्रात काम करणार नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे.