बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही नेहमीच चर्चेत असते. भूमी व तिची बहीण समीक्षा अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. दोघी त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र फोटोज आणि व्हिडीओजही शेअर करीत असतात. अनेकदा त्या दोघी सारख्या दिसतात, असंही म्हटलं गेलंय. पण, त्यांच्या सारख्या दिसण्यावरून पेडणेकर बहिणींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
भूमी आणि समीक्षानं तीन दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला; ज्यात दोघी बहिणी एकत्र तयार होताना आणि दोघी कॅमेऱ्यासमोर एकत्र लिपिस्टिक लावताना दिसतायत. ‘मी आणि माझी जवळची मैत्रीण’, अशी कॅप्शन समीक्षानं या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओमुळे अनेकांनी पेडणेकर बहिणींना ट्रोल केलंय. या ट्रोलला समीक्षानं सडेतोड उत्तरही दिलंय.
पेडणेकर बहिणींच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “जेव्हा एकच सर्जन तुमची सर्जरी करतो, तेव्हा असं घडतं. आम्ही दोघांमधला फरक ओळखू शकत नाही.” “एकच सर्जन की एकच पालक? कदाचित?”, असं खणखणीत उत्तर समीक्षानं कमेंट करीत दिलं.
“लाइफ इन प्लॅस्टिक इट्स सो फॅनटॅस्टिक” बार्बी गाण्यातील हे कडवं दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं. त्यावर “काय प्लॅस्टिक?” असा प्रत्युत्तरादाखल प्रश्न समीक्षानं विचारला.
“तुम्ही दोघी जुळ्या आहात का?”, “भूमीची बहीण अरबाज खानच्या बायकोसारखी दिसतेय.” “यातली भूमी कोण आहे हेच कळत नाही.” अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
हेही वाचा… मातीचं घर, विटांची चूल अन्…, मृण्मयी देशपांडेने पतीसह शेतात बांधलं घर
दरम्यान, भूमी पेडणेकरची बहीण समीक्षा ही वकिल व उद्योजक आहे. भूमीच्या आगामी चित्रपटाबाबत सांगायचं झाल्यास, ‘मेरे हजबंड की बीवी’ चित्रपटात भूमी, अर्जुन कपूर व रकुल प्रीत सिंग हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.