Neha Sharma On Bihar Election : आज, ११ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील १२२ जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची जागा म्हणजे भागलपूर. या भागातून प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्मा हिचे वडील अजित शर्मा काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
बिहारची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह विरोधी महागठबंधनसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे, त्यामुळे वडिलांसाठी नेहानं स्वत:हून वडिलांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. नेहानं वडिलांना पाठिंबा देण्यासाठी भागलपूरमध्ये प्रचारात सहभाग घेत रोड शो केला आणि स्थानिक जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
नेहाच्या या प्रचाराच्या रॅलीचे अनेक फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमानं अभिनेत्री भारावून गेली असून या सर्वच चाहत्यांना तिनं धन्यवाद म्हटलं आहे. तसंच वडिलांना मत देण्याचं आवाहन तिनं केलं आहे.
नेहा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते, सोशल मीडियावर ती तिचे विविध लूक्समधील फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते. अशातच नेहानं आपला इन्स्टाग्राम स्टोरीवर एक राजकीय पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून तिनं ‘यावेळी देवाच्या कृपेने आघाडीचं सरकार येईल’, असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावरील प्रचारांच्या व्हायरल व्हिडीओजबद्दल नेहा म्हणाली, “माझ्या प्रचाराच्या सर्व व्हायरल व्हिडीओसाठी धन्यवाद! भागलपूरमधल्या प्रत्येकाला माहीत आहे की, माझं मन नेमकं कुठे लागतं. माझे वडील नेहमी काँग्रेसबरोबर होते आणि यावेळी देवाच्या कृपेने आघाडीचं सरकार (INDIA Alliance) स्थापन होईल, त्यामुळे योग्य तो विचार करून मत द्या. कारण तुमचं एक-एक मत आपल्या देशासाठी महत्त्वाचं आहे.” याबरोबरच रोड शोदरम्यान माध्यमांशी बोलताना नेहा म्हणाली, “भागलपूरमध्ये माझ्या वडिलांचं कामच बोलत आहे. त्यांनी नेहमी लोकांसाठी काम केलं आहे आणि मला खात्री आहे की, या वेळीही जनता त्यांच्यावर विश्वास ठेवेल आणि त्यांना विजयी करेल.”

दरम्यान, नेहा शर्माचे वडील अजित शर्मा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. अजित शर्मा यापूर्वीही आमदार होते, त्यांनी याआधी लोकसभा निवडणूकही लढवली होती. गेल्या वर्षीही लोकसभा निवडणुकीच्यावेळी नेहा शर्मा बिहारला आली होती आणि त्यावेळीही तिनं वडिलांच्या प्रचारामध्ये सहभागी होत लोकांना त्यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. अशातच तिनं यावेळीही वडिलांसाठी प्रचार केला आहे.
