Aftab Shivdasani On Drug Case Rumors : बॉलीवूड आणि ड्रग्स हे कनेक्शन अनेक वेळा समोर आलं आहे. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांची ड्रग्स केसमध्ये नावे आली आहेत. अनेकदा काही कलाकारांचा या ड्रग्स केसशी थेट संबंध नसतो, पण अनेक कलाकारांच्या नावांच्या अफवा पसरतात. अशाच एका ड्रग्स केसमध्ये नाव आलेल्या अभिनेत्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदसानी सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘मस्ती ४’चं प्रमोशन करत आहेत. झूम सोबतच्या एका मुलाखतीत, अभिनेता आपल्या ड्रग्जच्या आणि सेटवर अॅटिट्यूड दाखवण्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत ड्रग्स केसवर आफताब शिवदासानी म्हणाला, “मी माझ्याबाबतीत ऐकलेली ही सर्वात मजेशीर अफवा आहे.” या अफवा ऐकूनही तो शांत कसा राहतो? असं त्याला विचारण्यात आलं त्यावर आफताब म्हणाला, “सत्य आवाज करत नाही हे मी आयुष्यात खूप आधीच शिकलो होतो. सत्य नेहमी शांत असतं. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. फक्त हीच थिअरी कायम ध्यानात ठेवा म्हणजे कोणालाच सिद्ध करण्याची गरज नसते.”
तो पुढे म्हणाला, “मी कधीच स्वतःविषयी काही बोलत नाही. एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. कारण जे खोटं आहे त्यावर विचार करुन मी माझी झोप का खराब करू? नेमकं सत्य काय, हे मला माहित आहे. जी माझी माणसं आहेत त्यांना सगळंच माहित आहे. मी काहीही न करता लोकांना जर ते मीच केलं आहे असं मानायचं असेल तर ते तेच मानणार आहेत.”
आफताब शिवदसानी इन्स्टाग्राम पोस्ट
सेटवर अॅटिट्यूड दाखवण्याच्या अफवांवर आफताबचं स्पष्ट मत
आफताबने पुढे सांगितलं की, जर त्यांनी सेटवर अॅटिट्यूड दाखवला असता, तर मी इंडस्ट्रीत टिकलोच नसतो. तसंच माझे अनेक दुश्मनही झाले असते. लोक माझ्याबद्दल वाईट बोलले असते. पण एक बरं आहे की, लोकांना मी आवडत नसलो तरी त्यांच्या मनात माझ्याबद्दलही काही राग नाही किंवा द्वेष नाही.”
दरम्यान, आफताब शिवदसानी लवकरच ‘मस्ती ४’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यात त्याच्यासह रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय हे मुख्य भूमिकांत आहेत. तसेच श्रेया शर्मा, रुही सिंह, एलनाज नोरोजी, तुषार कपूर, शाद रंधावा आणि निशांत मल्कानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
‘मस्ती ४’ या चित्रपटातून आफताबचा बॉलीवूडमध्ये सहा वर्षांच्या ब्रेकनंतर कमबॅक करत आहे. आफताब शिवदासानी रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय यांचा हा ‘मस्ती ४’ हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.
