Bollywood Actor Annu Kapoor Struggle : मनोरंजन क्षेत्रातील झगमगाटामागे अनेकदा कलाकारांच्या संघर्षगाथाही असतात. अनेक कलाकारांनी स्टारडम मिळण्यासाठी संघर्ष केलेला असतो. मग कोणी रेल्वे स्थानकावर रायतर काढलेली असते, तर कोणी उपाशी राहून दिवस काढलेले असतात. काहीजण याला संघर्ष म्हणतात, तर काही ही आयुष्य जगण्याची एक पद्धत असल्याचं सांगतात.

आज बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी संघर्ष करत लोकप्रियतेचा आणि प्रसिद्धीचा मोठा टप्पा गाठला आहे, त्यापैकीच एक म्हणजे अनू कपूर. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू आणि अनुभवी कलाकार म्हणून ओळखले जाणारे अनू कपूर आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालतात. मात्र त्यांचा प्रवास अगदीच सोपा नव्हता.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या संघर्षमय सुरुवातीच्या आठवणी सांगितल्या – चहा विकणं, वेगवेगळी कामं करणं, आणि वडिलांकडून मिळालेल्या सिनेमाविषयीच्या प्रेमाची आठवणही त्यांनी शेअर केली.

TV9 भारतवर्ष या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनू कपूर म्हणाले, “हो, मी चहा विकला होता. पण मला माझ्या गरिबीचा अभिमान वाटत नाही आणि ती फार मोठी दु:खद गोष्ट होती असंही मी मानत नाही. ती माझ्या जीवनाचा एक भाग होती, एक परिस्थिती होती – आणि मी त्या परिस्थितीला सामोरा गेलो.”

आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल म्हणून जेव्हा त्यांच्या संघर्षाविषयी अधिक विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, “मी फक्त चहा विकला होता, देश नाही! मी रिक्षा चालवली आहे, चुर्ण विकलं आहे, लॉटरी तिकीट विकली आहेत, अगदी फटाकेही विकले आहेत. पण जे काही केलं, ते प्रामाणिकपणे केलं आणि पोट भरण्यासाठी केलं.”

अनू कपूर पुढे सांगतात, “माझा जन्म भोपाळचा. पण १९६१ साली माझे वडील घर सोडून गेले. त्यांचा स्वतःचा एक नाट्यसंघ होता. पण तेव्हा समाजात रंगभूमी आणि सिनेमा करणाऱ्या लोकांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात होतं. त्यामुळे माझ्या आजीने, वडील नाटक करत असल्याचं समजल्यावर त्यांना घरातून हाकलून दिलं.”

आईबद्दल अनू कपूर म्हणाले, “माझी आई एक बंगाली ब्राह्मण असूनही उर्दू विदुषी होती. वडिलांनी त्यांना कायम प्रोत्साहन दिलं. वडिलांचा जन्म १९१९ सालचा असूनही ते खूप पुढारलेले विचार ठेवणारे होते. ते स्त्रियांचा खूप आदर करायचे. त्यामुळेच माझ्यातही स्त्रियांविषयी आदराचे तेच संस्कार आले.”

बालच्या आठवणी सांगताना अनू कपूर म्हणाले, “माझ्या आईचा महिन्याचा पगार फक्त ४० रुपये होता. पैसे वाचावेत म्हणून मी शाळेत चालत जायचो. ते दिवस आठवले की, आजची जीवनशैली म्हणजे महागडे सूट, आलिशान गाड्या – हे सगळं मला वास्तवात परत आणतं.”