Dharmendra And Hema Malini Lovestory : बॉलीवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. आजवर अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही बॉलीवूडमधील एव्हरग्रीन जोडी आहे. दोघांनी काही सिनेमांमधून एकत्र अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची मोहिनी निर्माण केली आहे.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. दोघांची लव्हस्टोरीही तितकीच हटके आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी ही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. चित्रपटाच्या प्रीमियरला त्यांची पहिली भेट झाली. शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

हेमा मालिनी यांनी आपल्या ‘Hema Malini: Beyond the Dream Girl’ या आत्मचरित्रात धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला आहे. त्या लिहितात, “आमची पहिली भेट एका चित्रपटाच्या प्रीमियरला झाली होती. जेव्हा मला स्टेजवर बोलावलं, तेव्हा मला एकटीने चालत जावं लागलं आणि मी खूपच लाजत होते. स्टेजच्या दिशेने चालत असताना मला धर्मेंद्रजी, शशी कपूर यांना पंजाबीमध्ये ‘कुडी बडी चंगी ए’ (ही मुलगी खूप सुंदर आहे) असं म्हटलेलं ऐकू आलं. मी मात्र ते दुर्लक्षित केलं. थोड्याच वेळात मला राज कपूर यांची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळख करून देण्यात आली. त्याक्षणी धर्मेंद्रजी आणि शशी कपूर यांच्याबरोबर स्टेज शेअर करताना मी खूप घाबरले होते.”

यानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जात. चित्रपटांच्या सेटवर एकत्र वेळ घालवताना त्यांचं नातं अधिक घट्ट झालं आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

हेमा मालिनी यांची इन्स्टाग्राम पोस्ट

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘नसीब’, ‘अलीबाबा और ४० चोर’, ‘अंधा कानून’, ‘छोटी सी बात’, ‘सम्राट’, ‘ड्रीम गर्ल’, ‘पत्थर और पायल’, ‘तुम हसीन मैं जवान’ आणि इतर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

सोमवारपासून धर्मेंद्र यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयासंबंधित आजारांमुळे गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईत उपचार घेत आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात करण्यात आलं असून त्यांचे संपूर्ण कुटुंबही रुग्णालयात उपस्थित आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल कळल्यानंतर चाहत्यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे