Dharmendra NetWorth : धर्मेंद्र हे भारतीय सिनेमातील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक सुरपहिट चित्रपट दिले आहेत. ‘शोले’, ‘फुल और पत्थर’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या धर्मेंद्र यांची नेटवर्थ किती आहे?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मुळचे पंजाबचे. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ मध्ये पंजाब येथे झाला होता. ८९ वर्षांचे धर्मेंद्र पुढच्या महिन्यात त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम केलं आहे. चला तर जाणून घेऊयात किती आहे धर्मेंद्र यांची नेटवर्थ…
धर्मेंद्र यांची नेटवर्थ किती?
‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांची संपत्ती जवळपास ५०० कोटी इतकी आहे. अभिनय, चित्रपटांची निर्मिती आणि ब्रँड इंडोर्मेंटमधून त्यांनी हे पैसे कमावले आहेत. धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांची ५०० कोटींची नेटवर्थ असून लोणावळा येथे त्यांचं १०० एकरचं एक मोठं फार्महाऊसही आहे. धर्मेंद्र यांना सिनेमांव्यतिरिक्त शेतीवाडीची आवड असून त्यांचे यासंबंधीतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सनी देओलची नेटवर्थ किती?
धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता सनी देओलनेही त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात चांगलं नाव कमावलं. त्यानेही आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार ‘बॉर्डर’ आणि ‘गदर’सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सनी देओलची नेटवर्थ १३० कोटी इतकी आहे.
बॉबी देओलची नेटवर्थ किती?
धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओल चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करतो. त्यानेही आजवर अनेक चित्रपटांत काम केलं आहे. बॉबी देओलच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर त्यांची नेटवर्थ ही ६६.७ कोटी इतकी आहे. म्हणजेच धर्मेंद्र यांची संपत्ती त्यांच्या दोन्ही मुलांपेक्षा अधिक आहे.
