Jimmy Shergill : ‘मोहब्बतें’, ‘ये जिंदगी का सफर’, ‘दिल है तुम्हारा’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘रहगुजर’, ‘बस एक पल’, ‘अजनबी’, ‘तनु विड्स मनु’, ‘स्पेशल २६’ या व अशा अनेक चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता जिमी शेरगिलची आज विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. फार कमी काळात त्यानं सिनेविश्वात मोठं नाव कमावलं आहे. आपल्या हरहुन्नरी अभिनयानं जिमीनं लाखो चाहत्यांच्या मनात स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
जिमीनं सिनेविश्वात १९९६ मध्येच पहिलं पाऊल ठेवलं होतं. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती ‘मोहब्बतें’ चित्रपटात झळकल्यानंतर. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचा हा पठ्ठ्या या चित्रपटानंतर अनेक तरुणींचा क्रश झाला होता. आजही जिमीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. जिमीचा आतापर्यंतचा प्रवास पाहता, तो अतिशय हुशार आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का? आज यशाच्या शिखरावर असलेला हा अभिनेता त्याच्या शाळेच्या दिवसांमध्ये कसा होता.
हेही वाचा : Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
गोरखपूरच्या जिमीनं शालेय शिक्षण लखनऊच्या सेंट फ्रान्सिस शाळेतून पूर्ण केलं आहे. तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यानं ‘पंजाब पब्लिक स्कूल नाभा’मधून पूर्ण केलं आहे. जिमीला त्याच्या एका मुलाखतीमध्ये तो शाळेत असताना अभ्यासात हुशार होता की आळशी होता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जिमीनं सांगितलं, “मी अशा मुलांमधला नव्हतो, जो वर्षभर अभ्यास करेल आणि पास होईल. मी फक्त वर्षभर पार्टी करायचो आणि परीक्षेच्या दोन ते तीन दिवस आधीच अभ्यास करायचो. त्यामध्येही मी प्रथम श्रेणीत (फर्स्ट क्लास) यायचो. फक्त दोन दिवसांच्या अभ्यासानंही मला ६० च्या पुढे गुण मिळायचे.”
“इतकंच नाही, तर अशीही वेळ आली की, मी फक्त एक रात्र आधी अभ्यास केला. इतका कमी अभ्यास करून परीक्षेला जाताना मी गुरुद्वारात जाऊन प्रार्थना करायचो. मी देवाला म्हणायचो की, यावेळी सांभाळून घे. पुढच्या वेळी नक्की अभ्यास करेन. असं मी तीन ते चार वेळा केलं”, असं अभिनेत्यानं स्वत: त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
हेही वाचा : “मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”
दरम्यान, जिमी सध्या त्याच्या ‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २९ नोव्हेंबरला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये जिमीबरोबर अभिनेत्री तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ओटीटीमध्ये नेटफ्लिक्सवर तुम्ही ‘सिकंदर का मुकद्दर’ पाहू शकता.