Ranveer Singh Dhurandhar Movie Set Accident : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहचा आगामी ‘धुरंधर’ चित्रपट या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच या चित्रपटाबद्दलची एक मोठी माहिती समोर येत आहे आणि ती म्हणजे या चित्रपटाच्या सेटवरील काही लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चित्रीकरणादरम्यान सेटवरील जवळपास १२० लोकांना विषबाधा झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, लडाखमध्ये चित्रीकरण सुरू असताना क्रू मेंबर्सना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रविवारी (१७ ऑगस्ट) ही घटना घडली. जेवणानंतर अनेकांना अचानक पोटदुखी, उलट्या, डोकेदुखी व अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सर्वांना तातडीनं लेहमधील SNM रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी हे प्रकरण सामूहिक विषबाधेचं असल्याचं सांगितलं आहे.

त्याबद्दल SNM हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ANI ला सांगितलं, “तत्काळ आमच्या डॉक्टरांना बोलावण्यात आलं. कारण- रुग्णांची संख्या अचानक खूप वाढली. दिवसभरात सुमारे १२० जण रुग्णालयात दाखल झाले; मात्र परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आणि सर्वांवर योग्य ते उपचार करण्यात आले.”

पुढे त्यांनी सांगितले, “बहुतेक रुग्ण आता बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केवळ पाच जण निरीक्षणाखाली ठेवले आहेत. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काहींना अतिशय डिहायड्रेशन झालं होतं, काहींना पोटात दुखणं, उलट्या, गॅस्ट्रोएन्टरायटिस व डोकेदुखीचा त्रास होता. जिल्हा प्रशासनाने आम्हाला मोठी मदत केली. काही रुग्णांना इतर ठिकाणी हलवून योग्य व्यवस्थापन करण्यात आलं.”

रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं, “चित्रपटाच्या सेटवरच हे अन्न दिलं गेलं होतं आणि त्यानंतर अनेकांना अतिसार व उलट्या सुरू झाल्या. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल येणे बाकी आहे.” दरम्यान, या विषबाधेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस अधिकारी अन्नाच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. तसेच आजारी पडलेल्यांमध्ये बॉलीवूडमधील कोणी कलाकार होते का, याचीही नेमकी माहिती अद्याप समोर आली नाही.

दरम्यान, ‘धुरंधर’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती ‘उरी’फेम आदित्य धर यांनी केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंहबरोबरच संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन व अर्जुन रामपाल या कलाकारांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये रणवीर सिंह लांब केस आणि दाढीसह अत्यंत जबरदस्त लूकमध्ये दिसला होता.