Kangana Ranaut Praises PM Narendra Modi : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मनोरंजन क्षेत्राबरोबरच तिने राजकारणातही प्रवेश केला आहे. ती भाजपाची खासदार आहे. राजकारणात आल्यानंतर ती अनेक मुद्द्यांवर तिची स्पष्ट मतं व्यक्त करताना दिसली आहे. अशातच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्याची ही तशी पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना “जगातील सर्वात मोठे फेमिनिस्ट” म्हटलं आहे.
अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने नुकत्याच एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत सत्तेवर आल्यानंतर भारतातील महिलांचं आयुष्य सुलभ करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अनेक पावलं उचलली असल्याचं सांगितलं.
Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “संपूर्ण जगात मोदीजींसारखा फेमिनिस्ट मला दुसरा कोणी वाटत नाही. सत्तेवर येताच सर्वप्रथम त्यांनी देशातील टॉयलेटची समस्या सोडवली. अनेक लोकांनी तेव्हा विचारलं होतं, एवढ्या मोठ्या नेत्याने आल्या आल्या बाथरूम का बनवले? पण, मोदींनी अगदी प्राथमिक गरजांपासून कामाला सुरुवात केली.”
पुढे कंगना म्हणते, “यानंतर त्यांनी महिलांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध करून दिले, म्हणजे महिलांना आधीप्रमाणे लाकूड गोळा करून चुलीवर अन्न शिजवावं लागणार नाही. पुढे त्यांनी महिलांचे बँक खातं उघडले आणि नंतर त्यांना राजकारणात आरक्षणही दिलं.”
पुढे कंगना म्हणाली, “अशा असंख्य गोष्टी त्यांनी केल्या आहेत. मला प्रवचन द्यायचं नाही, पण माझ्या मते इतका मोठा फेमिनिस्ट मी माझ्या आयुष्यात पाहिलाच नाही आणि विशेष म्हणजे, त्यांनी कधीही हे सगळं लोकांसमोर मिरवलं नाही. ते शांतपणे, दिखावा न करता काम करतात. ते एक ‘शांत फेमिनिस्ट’ आहेत.”
दरम्यान, कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकली होती. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.