बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. केवळ बॉलीवूडपर्यंतच मर्यादित न राहता तिने हॉलीवूडपर्यंतही मजल मारली आहे. प्रियांका चोप्राने काही सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक अडथळ्यांवर मात करत इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
बॉलीवूडच्या सध्याच्या टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीत येणाऱ्या काही नावांपैकी प्रियांका हे एक महत्त्वाचं नाव आहे. आजवर आपल्या अनेक फॅशन लुक्समुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. मात्र एकेकाळी प्रियांका खूप सावल्या रंगाची होती, तसंच तिची त्वचासुद्धा खराब होती. याबद्दल प्रसिद्ध निर्माते प्रल्हाद कक्कर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी प्रियांकाच्या प्रवासाचं कौतुक केलं आणि तिच्या यशामागील संघर्षाबद्दलही सांगितलं. याबद्दल ते म्हणाले, “प्रियांकासमोर खूप अडचणी होत्या. ती सावळ्या रंगाची होती, तिची त्वचा खराब होती – आजही थोडी आहे. त्यामुळे तिच्या मेकअपकडे विशेष लक्ष द्यावं लागायचं. ती ‘दोस्ताना’मध्ये जशी दिसलीय, तसं दिसण्यासाठी तिने खूप वजन कमी केलं. ती त्या चित्रपटात अक्षरशः जबरदस्त दिसली.”
प्रियांकाने तिच्या करिअरमध्ये घेतलेल्या प्रत्येक धाडसी निर्णयाबद्दल बोलताना प्रल्हाद म्हणाले, “तिला चांगल्या भूमिका मिळत होत्या, तिने नाव कमावलं होतं, पण तरीसुद्धा तिने ठरवलं की, आता नव्याने सुरुवात करायची. किती लोक असं धाडस करू शकतात?” यानंतर प्रल्हाद यांनी प्रियांकाबरोबर काम करण्याचा अनुभवही शेअर केला.
प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम पोस्ट
यावेळी ते प्रियांकाचं कौतुक करत म्हणतात, “प्रियांका म्हणजे एक गोड, समंजस व्यक्तिमत्व असलेली मुलगी. तिच्याबरोबर काम करणं म्हणजे खूप चांगला अनुभव असतो. ती खूप महत्वाकांक्षी मुलगी आहे. तिने नेहमीच आपला आत्मसन्मान टिकवून ठेवलाय.”
प्रल्हाद यांच्या मते, सुरुवातीच्या दिवसांतील अडचणी असोत किंवा बॉलीवूड सोडून हॉलीवूड इंडस्ट्रीत काम करण्याचा मोठा निर्णय असो… तिने प्रत्येक आव्हान आत्मविश्वासाने स्वीकारलं. त्यामुळेच आज प्रियांका केवळ भारतातच नव्हे, तर हॉलीवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकली आहे. तिची मेहनत, आत्मविश्वास आणि धाडस यामुळे ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.