Richa Chadda Shares Experience Of Working With Kangana Ranaut : मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये अनेकदा छान मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. अनेक कलाकारांनी त्यांच्या मुलाखतींमधून असं सांगितलं आहे की, सहकलाकारांबरोबरचा ऑफस्क्रीन बॉण्ड हा ऑनस्क्रीन काम करण्यासाठी अनेकदा फायदेशीर ठरतो. ऑफस्क्रीन मैत्री जरा छान असेल तर पडद्यावर मालिकांत किंवा सिनेमात काम करताना त्यांची मैत्री होते. मात्र, एका बॉलीवूड अभिनेत्रीने प्रत्येक सहकलाकाराबरोबर मैत्री होणं आवश्यक नसतं असं म्हटलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने नुकतंच एका मुलाखतीमध्ये वैयक्तिक आणि इंडस्ट्रीमधील अनुभवांबद्दल संवाद साधला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एक्स्प्रेसो या कार्यक्रमात अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान सहभागी झाले होते. यावेळी ऋचाने इंडस्ट्रीमधील सहकलाकारांबरोबरच्या कामाबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी तिनं कंगना रणौतबद्दलही तिचं मत व्यक्त केलं.

ऋचाला विचारण्यात आलं की, कंगना रणौतबरोबर पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव कसा होता. तेव्हा तिनं सहकलाकाराबरोबर मैत्री होणं आवश्यक नसतं असं स्पष्टपणे सांगितलं. ऋचा आणि कंगना रणौतने एकत्र ‘पंगा’ या चित्रपटात काम केलं होतं. याच संदर्भात विचारल्यावर ऋचा म्हणाली, “मी कंगनाशी फारसं बोलले नाही आणि आमच्यात मैत्री झाली नाही. पण, मला वाटतं ते पूर्णपणे ठीक आहे.”

ज्यांच्याबरोबर काम करतो, त्या प्रत्येकाशी मैत्री असलीच पाहिजे असं नाही : ऋचा चड्ढा

यापुढे ती म्हणाली, “आपण ज्यांच्याबरोबर काम करतो, त्या प्रत्येकाशी आपली मैत्री असलीच पाहिजे असं नाही. महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला सगळ्यांबरोबर व्यावसायिकरित्या काम करता आलं पाहिजे.” तसंच या वेळी ऋचाने स्पष्ट केलं की, “दिग्दर्शकांची भूमिका थोडी वेगळी असते. त्यांना प्रत्येक कलाकाराशी संवाद साधावा लागतो. पण, कलाकारांमध्ये मात्र असं नसलं तरी चालतं.”

मुलाखतीदरम्यान, ऋचाने समाजातील महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याबद्दलही तिचं मत व्यक्त केलं. जर पुरुष नसते, तर शारीरिक श्रमाची कामं कोणी केली असती? असा दावा केला जातो. त्यावर उत्तर देताना ऋचा म्हणाली, “आजही अनेक महिलांना गावात पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालावं लागतं. अनेक महिला मेहनतीची कामं करतात. त्यामुळे महिलांना शारीरिक श्रम जमत नाहीत, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आणि पुरुषप्रधान विचारसरणीचं आहे.”

दरम्यान, ऋचा चड्ढाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. संजय लीला भन्साळी यांच्या या सिरीजमध्ये तिची भूमिका छोटी असली, तरी तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यानंतर आता टी कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.