Bollywood Singer Angry Video : पावसाळा सुरू झाला की अनेकांना वेध लागतात ते पर्यटनाचे. पावसाळा सुरू होताच अनेक पर्यटक वीकेंडला निसर्गरम्य ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी जात असतात. मात्र पर्यटनाचा आणि निसर्गाचा आनंद घेत असतानाच अनेकजण अशा सुंदर ठिकाणी कचरा करतात.

निसर्गरम्य ठिकाणी कचरा ही एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक पर्यटक आणि स्थानिक लोक या ठिकाणी कचरा टाकतात. कचरा व्यवस्थापनाची योग्य सोय नसल्यामुळे, तसेच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता नसल्यामुळे कचरा सगळीकडे पसरलेला दिसतो.

असाच कचरा कामशेतच्या धबधब्याच्या ठिकाणी पाहायला मिळाला असून बॉलीवूडचा लोकप्रिय गायक विशाल ददलानीने या ठिकाणी असेलल्या कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. गायक विशाल हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या कामाबद्दलची माहिती तसंच स्वतःचे काही फोटो-व्हिडीओ सुद्धा शेअर करत असतो. अशातच त्याने धबधब्यावरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमधून त्याने आपली नाराजी व्यक्त करत असं म्हटलं, “नमस्कार मी महाराष्ट्रातील कामशेत या सुंदर ठिकाणी आता आलो आहे. कामशेत येथील शेलार हिल्स इथे आम्ही ट्रेकसाठी आलो आहोत. पण धबधब्याच्या ठिकाणी कचरा पाहायला मिळत आहे. कृपया अशा ठिकाणी कचरा करू नका.”

विशाल ददलानी इन्स्टाग्राम व्हिडीओ

यापुढे तो म्हणतो, “पाण्याच्या रिकाम्या बाटल्या इथे टाकण्यापेक्षा जाताना तुमच्याबरोबर घेऊन जा. घेऊन न जाण्याइतक्या त्या जड नाहीत. नुसत्या बाटल्या नाहीत, तर पेपर प्लेट्स अणि दारूच्या बाटल्यासुद्धा आहेत. कचरा करू नका अशी विनंती करण्यापेक्षा मी दुसरं काही करू शकत नाही. महाराष्ट्र माझं घर आहे आणि इथे असा कचरा करू नका.”

यासह त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही मराठीत कचरा न करण्याचं आवाहन केलं आहे. यात तो असं म्हणतो, “निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. आपण घाणेरडे का करत आहोत? आपण महाराष्ट्र आणि भारत स्वच्छ केला पाहिजे. फक्त ‘आपण सर्वोत्तम आहोत’ असे म्हणणे पुरेसं नाही. आपल्याला ते करावे लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशालने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा हा कचरा पाहून नाराजी व्यक्त केली आहे. तसंच विशालने कचरा न करण्याच्या केलेल्या या आवाहनाबद्दल त्याचं कौतुकही केलं आहे.