Boman Irani : ‘थ्री इडियट्स’मधील व्हायरसची भूमिका असो किंवा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील डॉक्टर असो, अभिनेते बोमन इराणी यांनी ही पात्रे रुपेरी पडद्यावर उत्तम प्रकारे साकारली आहेत. त्यांनी आपल्या प्रत्येक पात्रात नावीन्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो चाहत्यांना आवडलाही आहे. आपल्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर अलगद हसू फुलवणाऱ्या या अभिनेत्याला लहानपणी मात्र खूप संघर्षातून जावं लागलं आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत बोमन इराणींनी त्यांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. राज शमानी पॉडकास्टमध्ये बोमन इराणींनी त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. वडील ही संकल्पना कधीच कळली नाही, कारण त्यांनी स्वतः ती कधीच अनुभवली नाही. तसंच वडिलांच्या निधनानंतर आईच्या बिघडलेल्या प्रकृतीबद्दलही बोमन इराणींनी काही भावूक आणि हृदयस्पर्शी आठवणी शेअर केल्या.

वडिलांच्या आठवणीबद्दल बोमन इराणींनी म्हटलं, “मी कधी त्यांना पाहिलंच नाही. त्यांना कधीच बघितलं नसल्याने वडील म्हणजे काय, हे मला माहीतच नाही. वडिलांची संकल्पना मला कधीच खऱ्या अर्थाने समजली नाही. एखादा मुलगा लहानपणी त्याच्या वडिलांना गमावतो, तेव्हा कुटुंब त्याच्यावर खूप प्रेम करतं. लहानपणी मी नीट बोलू शकत नव्हतो किंवा व्यक्तही होऊ शकत नव्हतो. लहानपणी मी खूप घाबरट मुलगा होतो.”

बोमन इराणी इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे बोमन इराणींनी वडिलांच्या निधनानंतर आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित समस्या, तसंच आर्थिक समस्यांबद्दलही सांगितलं. “वडिलांच्या निधनानंतर माझ्या आईने सर्व जबाबदारी स्वत:वर घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने बराच काळ एका रुग्णालयात काम केले. तिला तिच्या आयुष्यात खूप काही सहन करावे लागले, यामुळे तिला मध्यरात्री पॅनिक अटॅकही येत असत.”

दरम्यान, सुरुवातीच्या काळात बोमन इराणी बेकरीमध्ये काम करायचे. त्यांच्या बेकरीमध्ये बटाट्याचे वेफर्स बनवले जात होते. यात ते वेफर्स पॅकिंगपासून दुकानावर त्याची विक्री करणे अशी कामे करायचे. इतकेच नाही तर बोमन यांनी चक्क हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केलं होतं. बेकरीमध्ये काम करण्याआधी ते ताज हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचे. यानंतर बोमण इराणींना वयाच्या ४२ व्या वर्षी एक शॉर्टफिल्म मिळाली होती.

या शॉर्टफिल्ममधील बोमन इराणींचा अभिनय प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी पाहिला होता. त्यांच्या अभिनयाने भारावून जात विधू विनोद चोप्रा यांनी बोमन इराणींना दोन लाखांचा चेक देत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटात झळकल्यानंतर बोमन इराणींना एका रात्रीत खूपच प्रसिद्धी मिळाली.

Live Updates