Chhaava Actor Welcome First Child Soon : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासून प्रत्येकजण या चित्रपटाचं कौतुक करत आहे. चित्रपटात विकी कौशलने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. शिवाय अक्षय खन्नाच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी दाद दिली. या चित्रपटात असा अजून एक अभिनेता आहे, ज्याच्या अभिनयाने सर्वांच लक्ष वेधलं तो म्हणजे अभिनेता विनीत कुमार सिंह.
छत्रपती संभाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही असे कवी कलश यांची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे विनीत कुमार सिंह. ’छावा’ चित्रपटात विनीतने आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप पाडली. ‘छावा’मधील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असल्याने अभिनेता आनंदी आहे. अशातच आता त्याच्या आनंदात आणखी भर पडली आहे, कारण अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
विनीत व त्याची पत्नी रुचिरा यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विनीतची पत्नी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. दोघांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर करत असं म्हटलं आहे की, “नवीन जीवन आणि आशीर्वाद! बाळ लवकरच येत आहे. नमस्ते, लहान बाळा… आम्ही तुझे स्वागत करण्यास सज्ज आहोत.” त्याने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेक कलाकार व चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
इंडिया टूडेनुसार आई-बाबा होण्याचा आनंद व्यक्त करत विनीत आणि रुचिराने असं म्हटलं की, “हा टप्पा आमच्या दोघांसाठीही अगदीच खास आहे. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या बाळाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत.” शिवाय पुढे विनीतने असं म्हटलं की “मी रुचिराची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. जुलैमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर मी पितृत्व रजा घेण्याचा विचार करत आहे.”
विनीत आणि पत्नी रुचिरा यांनी २०२१ मध्ये एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. या लग्नाचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षांनी दोघांनी आई-बाबा होणार असल्याची खुशखबर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. २०२५ हे वर्ष अभिनेता विनीतसाठी खूपच खास आहे. एकीकडे त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच तो लवकरच बाबाही होणार आहे.
दरम्यान, विनीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर यंदाच्या वर्षांत त्याच्या ‘छावा’मधील अभिनयाचं प्रचंड खूप कौतुक झालं. त्यानंतर विनीतने सनी देओलबरोबर ‘जाट’मध्येही उत्तम अभिनय केला आहे. यात विनीतने खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’मधील अभिनयानेही त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या संस्मरणीय भूमिकांनंतर अभिनेता आता कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.