Deepika Padukone On Over Work Demand : अनेक बॉलीवूड सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. आपल्या अभिनयासह हटके स्टायलिंग अन् बिनधास्त वक्तव्यामुळेही दीपिका पादुकोण कायमच चर्चेत राहते. अशातच या वर्षात तिच्या चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे तिनं कामाच्या तासांबद्दल केलेली मागणी. या वर्षभरात दीपिका कामाच्या अतिरिक्त तासांवर, विशेषत: महिला कलाकारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर उघडपणे बोलल्यामुळे चर्चेत राहिली आहे.
अशातच आता दीपिकाने पुन्हा एकदा या विषयावर लक्ष वेधलं आहे. नव्यानं आई झालेल्या अभिनेत्रींना किंवा स्त्रियांना पुन्हा कामावर परतताना मिळणाऱ्या कमी पाठिंब्याबद्दल बोलताना तिने ‘अतिकाम करणं’ ही गोष्ट सामान्य समजली जाते आणि ही मानसिकता बदलणे अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. याबद्दल “आई झाल्यानंतर कामावर परतणाऱ्या स्त्रियांना पाठिंबा देणं खूप महत्त्वाचं आहे आणि यावर मी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे,” असं म्हटलं.
Harper’s Bazaar सोबतच्या संभाषणात दीपिकाने सांगितले, “आपण ‘ओव्हरवर्किंग’ म्हणजेच अतिकाम करणं सामान्य करून टाकलं आहे. कामावरील निष्ठा असा गैरसमज निर्माण झाला आहे. मानवी शरीर आणि मनासाठी दिवसाचे आठ तासच काम करणं पुरेसं आहे. तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही तुमचं सर्वोत्तम देऊ शकता. थकलेल्या माणसाला पुन्हा कामात ढकलून देण्यात कोणाचाच फायदा नाही.”
आई झाल्यानंतर आयुष्यच बदललंय : दीपिका पादुकोण
यापुढे तिने आई झाल्यानंतर जीवनात काय बदल झालाय का? या प्रश्नावर उत्तर देत म्हटलं, “आई झाल्यानंतर माझ्या आयुष्यात शंभर टक्के बदल झाला आहे. आईपणाविषयीच्या सगळ्या म्हणी अगदी खऱ्या ठरतात. ते म्हणतात ना, ‘तू स्वतः आई झाल्यावर समजेल’, ते अगदी खरं आहे. आता माझ्या मनात आईबद्दलचा आदर खूपच वाढला आहे. आई झाल्यानंतर काय काय कारायचं हे तुम्ही आधीच ठरवू शकता, पण प्रत्यक्षात परिस्थिती अगदी वेगळी असते.”
दरम्यान, याच वर्षाच्या सुरुवातीला Brut India सोबतच्या संभाषणात दीपिकाने स्पष्ट केलं होतं की ८ तासांच्या कामाच्या दिवशीची तिची मागणी अवास्तव नाही. ती म्हणाली, “मी जे मागते आहे ते अजिबातच अवास्तव नाही. या इंडस्ट्रीत पुरेसं काम केलेल्या लोकांनाच प्रत्यक्ष कामाच्या परिस्थितीची खरी कल्पना असते आणि हे मी स्वतःबद्दल म्हणते आहे. मी एक ‘टॉपची स्टार’ असूनसुद्धा ही परिस्थिती आहे, मग बाकीच्यांची, विशेषत: क्रू मेंबर्सची परिस्थिती कशी असेल याची तुम्ही कल्पना करा.”
कामाच्या तासांच्या मागणीवरूनच दीपिकाने संदीप रेड्डी वंगाच्या ‘स्पिरिट’ या प्रभासबरोबरच्या चित्रपटातून माघार घेतली. फक्त आठ तास काम करण्याची तिने केलेली मागणी मान्य करण्यात आली नाही, त्यामुळे या सिनेमातून तिला काढण्यात आलं. याबाबत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं की कल्की 2898 AD च्या पुढील भागात दीपिका ‘सुमती’ या भूमिकेत दिसणार नाही.
दीपिकाच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवर अनेक इंडस्ट्रीतून प्रतिक्रिया उमटल्या. दीपिकाची ८ तासांच्या कामाची मागणी ही व्यक्तीसापेक्ष असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. विक्रांत मॅसी, काजोल, सैफ अली खान, नेहा धूपिया, मणी रत्नम, विनय पाठक, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि कबीर खानसह काही कलाकार मंडळींनी तिची ही मागणी रास्त असल्याचं म्हटलं आहे.
