Dhanush Letter रांझणा हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी आणि तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात सोनम कपूर आणि धनुष हे दोघंही प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचा शेवट AI च्या मदतीने एडिट करण्यात आला आहे आणि चित्रपट १ ऑगस्टला नव्या शेवटासह प्रदर्शित झाला आहे. मात्र एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन सिनेमाचा शेवट बदलण्यात आल्याने इरॉस फिल्म्स विरुद्ध दिग्दर्शक आनंद एल रॉय चांगलेच नाराज झाले. आता अभिनेता धनुषनेही नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटाचं कथानक काय?
बनारसमध्ये राहणारा कुंदन आणि मुस्लिम मुलगी झोया यांची ही प्रेमकहाणी चित्रपटात दाखवली गेली आहे. शिवाय या चित्रपटाला ए. आर. रहमानचं संगीत आहे. लहानपणापासून झोया कुंदनला आवडत असते. शाळेत जाऊ लागल्यानंतर झोयालाही कुंदन आवडू लागतो. पण हे त्यांच्या घरी कळतं तेव्हा झोयाला अलिगढ विद्यापीठात धाडलं जातं. दोघांचे मार्ग बदलतात. महाविद्यालयात शिकत असताना झोयाच्या आयुष्यात अक्रम येतो. पण एक प्रसंग असा घडतो की कुंदनमुळे अक्रमचा मृत्यू होतो. त्यानंतर झोया कुंदनचा तिरस्कार करु लागते. या सगळ्यात पुढे अशी वळणं येतात की झोया कुंदनच्या मृत्यूला जबाबदार ठरते. कुंदन मृत्यूनंतर चित्रपटाचा शेवट होतो. अशी या चित्रपटाची थोडक्यात कथा आहे. मात्र आता नव्या चित्रपटात शेवट बदलला गेला आहे. ज्यामध्ये कुंदन जिवंत होतो असं दाखवलं गेलं आहे. याबाबत कुंदनची भूमिका करणाऱ्या धनुषने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

धनुषची पोस्ट काय?
AI च्या मदतीने रांझणाचा शेवट बदलण्यात आला. ही बाब माझ्यासाठी क्लेशदायक आहे. २०१३ मध्ये आलेला आमचा चित्रपट बेकायदेशीर पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात कुंदन मरतो या गोष्टीला एक सर्जनात्मक अर्थ होता. एआयच्या मदतीने संपादन करुन चित्रपटातली सर्जनशीलता मारली आहे. यामुळे चित्रपटाचा आत्माच हरवला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. १२ वर्षांपूर्वी मी केलेला रांझणा चित्रपटच माझा आहे. नव्याने प्रदर्शित झालेला चित्रपट माझा आहे असं मला कधीच म्हणावंसं वाटणार नाही, मी म्हणणारही नाही. अशा पद्धतीने एआयचा वापर करुन चित्रपट एडिट करणं हे कुठल्याही कलाकारासाठी काळजी वाढवणारं आणि धोकादायक आहे. अशा पद्धतीने शेवट बदलण्याचे प्रकार भविष्यात थांबतील अशी अपेक्षा मी करतो अशा आशयाची एक पोस्ट अभिनेता धनुषने केली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद रॉय यांनी मागच्या आठवड्यात काय म्हटलं होतं?
द स्क्रीनशी चर्चा करताना दिग्दर्शक आनंद रॉय म्हणाले, काही कोटींच्या कमाईसाठी हे लोक दिग्दर्शक, लेखक आणि कलाकरांनी केलेल्या कलाकृतीशी छेडछाड करत आहेत. टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करा त्याचं स्वागत करु. मात्र हे सगळं जे काही चाललं आहे ते धोकादायक आहे. उद्या मनात आलं तर लोक शोले चित्रपटात जय आणि विरु दोघांनाही जिवंत राहिलेलं दाखवून चित्रपटाचा क्लासमॅक्सच बदलला जाईल अशीही भीती आनंद एल रॉय यांनी बोलून दाखवली.