बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी गेली अनेक दशकं रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. ‘शोले’, ‘यादों की बारात’ ते अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’पर्यंत…धर्मेंद्र यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांची दोन मुलं सनी, बॉबी, ईशा देओल तसेच नातवंडं करण आणि राजवीर ही मंडळी सुद्धा आता बॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत. पण, तुम्हाला माहितीये का धर्मेंद्र यांच्या सुनेने एका हॉलीवूड प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे.

धर्मेंद्र यांच्या सुनेचं नाव आहे दीप्ती भटनागर. धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ वीरेंद्र यांचा मुलगा रणदीप आर्यशी दीप्तीचं लग्न झालेलं आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे झाला. १९९५ मध्ये दीप्तीने मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘रामशास्त्र’ या चित्रपटातून दीप्तीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, मनीषा कोइराला आणि आदित्य पंचोली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

शाहरुख खानकडून घेतलं प्रशिक्षण

दीप्ती भटनागरने शाहरुख खानबरोबर एका जाहिरातीत काम केलं होतं. याशिवाय ‘कभी हां कभी ना’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखने तिला अभिनयाचं प्रशिक्षणही दिलं होतं. पण, दीप्ती स्क्रीन टेस्टदरम्यान पळून गेली होती आणि शेवटी सिनेमात सुचित्रा कृष्णमूर्तीची वर्णी लागली.

काही वर्षांपूर्वी दीप्तीने ‘हिंदुस्थान टाइम्स’ला मुलाखत दिली होती यावेळी ती म्हणाली होती की, “वयाच्या २२ व्या वर्षी मी मुंबईत आले. जुहू येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी माझं अकाऊंट ओपन केलं होतं. तसेच महिनाअखेरीस या बँक अकाऊंटमध्ये एक लाख रुपये तरी जमा झाले पाहिजेत असा निश्चय मी केला होता. मॉडेलिंगमुळे हे शक्य झालं. मुंबईत आल्यावर स्वत:चं हक्काचं घर घ्यायचं हे माझं स्वप्न होतं. पुढच्या ११ महिन्यांत मी जुहू येथे माधुरी दीक्षितकडून घर विकत घेतलं होतं.”

दीप्ती हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. १९९७ मध्ये, दीप्ती भटनागरने हॉलीवूड चित्रपट Inferno मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. वैयक्तिक आयुष्यात तिने रणदीप आर्यशी लग्न केलं. रणदीपचे वडील वीरेंद्र हे धर्मेंद्र यांचे चुलतभाऊ आहेत. त्यामुळे दीप्ती नात्याने धर्मेंद्र यांची सून लागते. दीप्ती आणि रणदीप यांना शुभ आणि शिव अशी दोन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून दीप्ती भटनागर अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. ती ट्रॅव्हल व्लॉगर म्हणून काम करतेय. युट्यूबवर तिचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत.