Abir Gulaal Movie Release Update : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तरपाकिस्तानी कलाकारांची सोशल मीडिया अकाउंट्ससुद्धा भारतात बॅन करण्यात आले. तसेच पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटांवरसुद्धा बंदी घालण्यात आली. ‘अबीर गुलाल’ या सिनेमावरसुद्धा भारतात बंदी घालण्यात आली होती; मात्र आता हा सिनेमा प्रदर्शनास सज्ज झाला आहे.
फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा सिनेमा भारतात ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आणि भारतीय चित्रपट संघटनांनी घोषणा केली की, जो कोणी पाकिस्तानातील कलाकारांबरोबर काम करील, त्याला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र, अनेक अडचणी आणि वादविवादानंतर हा सिनेमा आता प्रदर्शित होत आहे.
Biz Asia च्या रिपोर्टनुसार, ‘अबीर गुलाल’ २९ ऑगस्टला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव, तसेच भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीमुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. भारत देश सोडून सिनेमाच्या निर्मात्यांनी तो इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘अबीर गुलाल’ चित्रपटाचा टीझर आणि गाणी भारतात खूप लोकप्रिय झाली होती. फवाद खानच्या पुनरागमनामुळे भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह होता. कारण- तो तब्बल नऊ वर्षांनंतर भारतीय स्क्रीनवर झळकणार होता. पण, पहलगाम हल्ल्यानंतर जनतेचा सूर एकदम बदलला आणि अनेक भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
चित्रपटावर बंदी आल्यावर अभिनेत्री वाणी कपूरवर प्रचंड टीका झाली. काही लोकांनी तिला ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी केली. त्याबद्दल एका कार्यक्रमात वाणी म्हणाली, “सध्याचं वातावरण खूप विषारी झालंय. सतत ऐकायला येतं, ‘आज याला बॉयकॉट करा, त्याला बॉयकॉट करा’. असं करू नका रे… थोडीशी माणुसकी ठेवा आणि लोकांना जगू द्या.”
तसेच या चित्रपटात सहभागी असलेली अभिनेत्री ऋद्धी डोग्रा हिनेसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाली, “मी जेव्हा हा चित्रपट केला, तेव्हा भारत-पाकिस्तानमधील परिस्थिती ठीक होती. मी कोणत्याही कायद्याचा भंग केला नाही. मी या देशाचीच नागरिक आहे. आज जर परिस्थिती बदलली आहे, तर मी माझ्या देशाच्या आणि जवानांच्या बाजूने उभी आहे.”
दरम्यान, ‘अबीर गुलाल’ या चित्रपटात फवाद खान आणि वाणी कपूर यांच्यासह लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, परमित सौठी असे काही कलाकार आहेत. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं. आरती एस. बागरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आता हा सिनेमा भारताशिवाय इतर देशांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या देशांत या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.