Riteish Deshmukh : रितेश देशमुख व त्याचे कुटुंबीय दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवाचा सण साजरा करतात. अलीकडच्या काळात अनेक लोक पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यास प्राधान्य देतात. अभिनेता रितेश सुद्धा गेली अनेक वर्षे आपल्या मुलांसह बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारत आहे. यापूर्वी त्याने देशमुखांच्या घरातील सगळ्या मुलांना एकत्र आणून कधी मातीचा वापर करून तर, कधी पेपर, मेटल या माध्यमातून बाप्पाची मूर्ती घडवली होती. मात्र, यंदा रितेशच्या दोन्ही मुलांनी पुढाकार घेऊन अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे.
जिनिलीया व रितेश यांच्या दोन्ही मुलांच्या संस्कारांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं. यंदा या दोघांनी पुढाकार घेऊन जवळपास २ ते ३ महिने आधीपासूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली होती. यावर्षी रियान आणि राहील यांनी रोबोटिक-गेमिंग थीमनुसार बाप्पाचा देखावा तयार करायचा असं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीने फूसबॉल ( foosball ) गेमिंग सेटअप तयार केला. यामध्ये दोन टीम असतील. जी टीम जिंकणार त्या टीमचा रोबोटिक मोदक बाप्पाच्या चरणापाशी पोहोचणार आणि ती टीम जिंकणार असा हा संपूर्ण सेटअप यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशमुखांच्या घरात तयार करण्यात आला आहे. याचा सविस्तर व्हिडीओ रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रितेश म्हणतो, “नमस्कार, दरवर्षी गणपतीचा सण आला की, आम्ही विचार करत असतो यंदा बाप्पाची मूर्ती कशी घडवायची. एक वर्ष आम्ही क्लेचा वापर करून बाप्पाची मूर्ती घडवली होती. एकदा वर्तमानपत्रांचा वापर केला होता, त्यानंतर मेटलचा वापर आम्ही बाप्पाची मूर्ती बनवली होती. पण, यावर्षी मी मुलांना म्हणालो, काहीतरी नवीन करुयात. माझ्या मुलांनी रोबोटिक क्लास जॉईन केला होता. त्यामुळे यंदा रोबोट, बाप्पा आणि फूसबॉल ( foosball ) अशी थीम त्यांनी निवडली. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांचा बाप्पाची मूर्ती घडवण्याचा प्रवास सुरू केला होता. २२ उंदीर मामा, २ रोबोटिक मोदक आणि आपले गणपती बाप्पा…हे सगळं मुलांनी प्रशिक्षकांच्या मदतीने डिझाइन केलं होतं.”
“पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.” असं जिनिलीयाने या व्हिडीओच्या शेवटी सांगितलं. या व्हिडीओमध्ये रितेश जिनिलीयाची मुलं रियान-राहील तसेच अमित व धीरज देशमुख यांची मुलं या सगळ्यांनी मिळून एकत्र बाप्पासाठी सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं या सुंदर थीमसाठी भरभरून कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.