Genelia Deshmukh Reply To Fan : सोशल मीडियाद्वारे अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना लग्न करण्याची मागणी करताना दिसतात. चाहत्यांच्या या मागणीला कलाकार मंडळी अनेकदा मजेदार किंवा हलक्या-फुलक्या पद्धतीने उत्तर देतात. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिच्याबरोबर. साऊथ आणि बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने आणि मनमोहक सौंदऱ्यानं अनेकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलीया देशमुख.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी जिनिलीया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर ती रितेशबरोबरही काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. अशातच जिनिलीयाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील आस्क मी सेशनद्वारे चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. अशातच एका चाहत्याने जिनिलीयाला चक्क लग्नाची मागणी घातली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्याने असं म्हटलं की, “माझं तुझ्यावर प्रेम आहे, लग्न करशील का?” चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत जिनिलीया असं म्हणाली, “मी विचार केला असता; पण माझं सर्वात सुंदर व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे.”

जिनीलियाने दिलेल्या या उत्तरातून त्याचं रितेशवरील प्रेम दिसून येतं. यानंतर तिला आणखी एका चाहत्याने नात्याबद्दल सल्ला विचारला. यावर जिनिलीयाने “कोणाचाही सल्ला ऐकू नका. तुम्ही स्वत: त्या नात्याचा अनुभव घ्या” असं म्हणाली. दरम्यान, रितेश-जिनिलीयाकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघे अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.

रितेश-जिनिलीया यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, जिनिलीयाचा नुकताच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अभिनेत्री आमिर खानसह मुख्य भूमिकेत आहेत, या चित्रपटातील जिनिलीयाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याशिवाय रितेश-जिनिलीया यांच्या गाजलेल्या ‘वेड’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल स्वत: जिनिलीयाने खुलासा केला आहे. याबद्दल ती म्हणाली, “‘वेड २’ ठरलेलंच आहे! त्याला थोडा वेळ लागू शकतो, कदाचित एक किंवा दोन वर्ष. पण प्रेक्षक सतत याबद्दल विचारत असतात; त्यामुळे हा चित्रपट नक्की होणार.”