Genelia Deshmukh Shares Cute Video : जिनिलीया देशमुख आपलं काम सांभाळून नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देताना दिसते. अभिनेत्रीला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. रितेश-जिनिलीयाकडे मनोरंजन विश्वातील ‘आदर्श जोडी’ म्हणून पाहिलं जातं. याशिवाय या दोघांनी त्यांच्या मुलांना दिलेल्या संस्कारांचं सुद्धा सोशल मीडियावर कायम कौतुक करण्यात येतं. व्यग्र शूटिंगमधून ब्रेक मिळाल्यावर रितेश-जिनिलीया आपल्या मुलांसह वेळ घालवताना दिसतात. अभिनेत्रीने नुकताच शेअर केलेला एक गोड व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.
जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा मोठा लेक रियान लाडक्या आईसाठी तिचा हेअरस्टायलिस्ट बनल्याचं पाहायला मिळत आहे. जिनिलीयाच्या केसांची नीट काळजी घेऊन रियान तिची हेअरस्टाइल करताना दिसतो. या व्हिडीओमध्ये पुढे एन्ट्री होते अभिनेत्रीचा धाकटा लेक राहीलची… तो सुद्धा मोठ्या भावाचं कौतुक करताना यामध्ये दिसतोय. शेवटी जिनिलीया आपल्या दोन्ही मुलांना फ्लाइंग किस देते. या व्हिडीओला अभिनेत्रीने, “आय नीड समबडी हू कॅन लव्ह मी अॅट माय Worst” हे इंग्रजी गाणं लावलं आहे.
जिनिलीया हा गोड व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिते, “माझ्या दोन्ही मुलांबरोबर मी अशाप्रकारे हा वीकेंड साजरा केला…हे दोघंही त्यांच्या बाबाकडून या सगळ्या ( हेअरस्टाइल ) गोष्टी शिकले आहेत” या व्हिडीओमध्ये तिने रितेशला देखील टॅग केलं आहे. रितेशने बायको अन् मुलांचा हा क्युट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर रिशेअर करत यावर ‘किती गोड’ अशी कमेंट केली आहे.
देशमुख कुटुंबीयांचा हा गोड व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. जिनिलीया नेहमीच दोन्ही मुलांबरोबर असे क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते आणि या सगळ्या व्हिडीओला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
दरम्यान, जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ या सिनेमात झळकली होती. याशिवाय ‘राजा शिवाजी’ या रितेशच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सिनेमाची जिनिलीया निर्मिती करणार आहे. या भव्य ऐतिहासिक सिनेमात ती कोणती भूमिका साकारणार हे अद्याप उघड झालेलं नाही. पुढच्या वर्षी १ मे रोजी हा ‘राजा शिवाजी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.