Govinda Sunita Ahuja Divorce: गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या, पण तेव्हा सुनीताने अर्ज मागे घेतल्याचं वकिलांनी सांगितलं होतं. आता कुणीतरी आपला संसार मोडण्याचा प्रयत्न करतंय आणि त्या व्यक्तीला देव माफ करणार नाही, असं सुनीता तिच्या व्लॉगमध्ये म्हणाली आहे.
सुनीता व गोविंदा यांच्यात बिनसल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. दोघेही ३८ वर्षांपासून एकत्र असले तरी एकेकाळी मात्र बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेल्या गोविंदाने सुनीताशी साखरपुडा मोडला होता. गोविंदाने स्वतःच एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
गोविंदा ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता ती म्हणजे नीलम कोठारी होय. गोविंदा व नीलम यांनी अनेक चित्रपट एकत्र केले होते. याचदरम्यान तो नीलमच्या प्रेमात पडला आणि सारखा तिचंच कौतुक करत असायचा. गोविंदाची नीलमशी वाढती जवळीक पाहून सुनीताला असुरक्षित वाटत होतं.
नीलमच्या प्रेमात होता गोविंदा
“आमची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती, पण हळूहळू आमची मैत्री झाली आणि आम्ही अनेक चित्रपट एकत्र केले. आम्ही अनेकदा भेटायचो. मी तिला जितकी जास्त ओळखू लागलो, तितकीच मला ती आवडू लागली. ती एक अशी स्त्री होती, जिच्या प्रेमात कोणताही पुरुष पडेल. मी तिच्या प्रेमात पडलो होतो,” असं गोविंदा नीलमबद्दल म्हणाला होता.
सुनीताला नीलमसारखं व्हायला सांगायचा गोविंदा
“मी नीलमचं नेहमी कौतुक करायचो. माझ्या मित्रांना, कुटुंबाला आणि अगदी जिच्याबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होतो त्या सुनीताला मी बदलायला सांगितलं आणि तिला नीलमसारखं व्हायला सांगितलं होतं. मी तिला म्हणायचो की नीलमकडून काहीतरी शिक. त्यामुळे सुनीता नाराज व्हायची आणि म्हणायची की मी तीच आहे जिच्या प्रेमात तू पडलास, त्यामुळे मला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मात्र मी गोंधळलो होतो, मला काय हवंय ते मला समजत नव्हतं”, असं गोविंदा म्हणाला होता.
गोविंदाने मोडला होता साखरपुडा
एकदा सुनीताने गोविंदाला नीलमबद्दल काहीतरी म्हटलं आणि त्या रागात गोविंदाने साखरपुडा मोडला होता. “मी सुनीताला म्हटलं की मला सोडून दे. मी तिच्याशी साखरपुडा मोडला. तिने पाच दिवसांनंतर मला फोन केला नसता, तर आमच्यात गोष्टी नीट झाल्या नसत्या. मी कदाचित नीलमशी लग्न केलं असतं. हो. मला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही,” असं गोविंदा म्हणाला होता.
नीलमवर प्रेम, मग गोविंदाने सुनीताला का सोडलं नाही?
“मी दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडलो होतो म्हणून, मी सुनीताला दिलेलं वचन विसरू शकत नाही. माणसाला कर्तव्याची जाणीव नसेल तर हे असंच चालू राहील,” असं तो म्हणाला होता. तसेच नीलमला त्याच्याशी लग्न करण्यात फारसा रस नव्हता, तिला करिअर करायचं होतं, असंही गोविंदाने नमूद केलं होतं.
गोविंदाने लग्न केल्यावर त्याबद्दल कुणालाच सांगितलं नव्हतं. नीलमला देखील याबाबत माहिती नव्हती. दरम्यान, आता इतक्या वर्षांनी गोविंदा व सुनीता यांच्या नात्यात दुरावा आला आहे. दुसरीकडे नीलमबद्दल बोलायचं झाल्यास तिने पहिलं लग्न ऋषी सेठीयाशी केलं होतं, पण त्यांचा घटस्फोट झाला. नंतर तिने अभिनेता समीर सोनीशी दुसरं लग्न केलं. नीलम आता सीरिज व चित्रपटांमध्ये काम करते.