Sunita Ahuja On Ahaan Panday Comment : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा या कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत येत असतात. काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल समाजमाध्यमांतून अनेक वृत्तं समोर येत होती. अशातच त्यांनी मुलगा यशच्या आगामी सिनेमाबद्दल वक्तव्य केलं.
यावेळी सुनीता यांनी माझा मुलगा यशचा अहान पांडेच्या ‘सैय्यारा’पेक्षाही भारी सिनेमा येत असल्याचं म्हटलं. त्यानंतर सुनीता यांनी मुलगा यश आणि अहान पांडेची तुलना केल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. त्यावर आता सुनीता यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी दोन्ही कलाकारांची तुलना करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलं.
त्याचबरोबर त्यांनी अहानची प्रशंसा करीत चाहत्यांनी चुकीच्या अफवा पसरवू नयेत, असं आवाहनही केलं. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, माध्यमांशी बोलताना सुनीता म्हणाल्या, “मी असं काही म्हणालेले नाही. अहान पांडेनं स्वतःचं नाव कमावल्याचा मला खूप आनंद आहे. मी त्याबाबत काहीही नकारात्मक बोललेले नाही. आहान, मी तुझी मोठी चाहती आहे. इंडस्ट्रीतल्या सर्व मुलांना यश मिळावं हीच इच्छा आहे. कृपया अफवा पसरवू नका.”
यापूर्वी ‘ईट ट्रॅव्हल रिपीट’ला दिलेल्या मुलाखतीत यशच्या चाहत्यानं, “यशवर्धन इतका सुंदर आहे. ‘सैय्यारा’मध्ये तो असाच असायला पाहिजे होता” असं म्हटलं होतं. त्यावर सुनीता म्हणालेल्या, “माझीही अशीच इच्छा आहे. पण, यश त्याहूनही चांगला चित्रपट करतोय. मी ‘सैय्यारा’ अजून पाहिलेला नाही. यशने दोनदा पाहिला आहे. मला असं वाटतं की, इंडस्ट्रीतल्या सर्व मुलांनी मोठं नाव कमवावं.”
सुनीता यांच्या अहानबद्दलच्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास झाला, ज्यामुळे त्या स्वत:च्या मुलाची आणि अहानची तुलना करीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर आता सुनीता यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू स्पष्ट केली आहे आणि तसं काही नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सुनीता व गोविंदा यांनी नुकतीच त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांवरही प्रतिक्रिया दिली. यावेळी सुनीता यांनी गोविंदा फक्त माझा आहे अशा थोडक्याच शब्दांत घटस्फोटाच्या सर्व चर्चांवर स्पष्ट मत मांडलं.