Hansika Motwani post Viral: अभिनेत्री हंसिका मोटवानी मागील काही दिवसांपासून सातत्याने तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हंसिकाचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हंसिका व तिचा पती सोहेल खातुरिया यांच्या नात्यात दुरावा आला असून दोघेही विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच तिने केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

हंसिका व तिचा पती सोहेल खातुरिया यांच्या वैवाहिक आयुष्यात सगळं आलबेल नसल्याचं वृत्त आहे. सोहेल व हंसिका दोघेही वेगळे राहत आहेत. हंसिकाने तिच्या लग्नाचे व पतीबरोबरचे इतरही फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत आणि यामुळे तिच्या विभक्त होण्याचं वृत्त खरं असल्याची चर्चा रंगली आहे. नुकताच हंसिकाने तिचा ३४ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे.

हंसिका मोटवानीने ९ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. तिने निळ्याशार समुद्राचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “खूप नम्र आणि कृतज्ञ आहे. प्रत्येक छोट्या क्षणासाठी कृतज्ञ आहे. या वर्षी मला असे धडे मिळाले जे मला अपेक्षित नव्हते. आणि मला माहीत नव्हतं की माझ्याकडे अशी ताकद आहे. माझं मन भरलंय. फोनही भरलाय, मन शांत झालंय. वाढदिवसाच्या जादुई क्षणांसाठी आभार.”

पाहा स्टोरी-

hansika motwani
हंसिका मोटवानीची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

हंसिका मोटवानीने डिलीट केले फोटो

हंसिका मोटवानीने ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खातुरियाशी राजस्थानमध्ये लग्न केलं होतं. सोहेल खातुरिया हा मुंबईतील बिझनेसमन आहे. सोहेलने हंसिकाला पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर प्रपोज केलं होतं. हंसिकाच्या अकाउंटवर तिच्या पतीबरोबरचे फोटो होते, जे आता तिने हटवले आहेत. काही दिवसांपूर्वी हंसिकाच्या अकाउंटवर पती सोहेलच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्ट होत्या. तसेच लग्नाचे व व्हेकेशनचे फोटोही होते. ते फोटो आता तिने डिलीट केले आहेत.

सोहेल खातुरियाचा पहिला घटस्फोट

सोहेल खातुरियाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं पहिलं लग्न रिंकी बजाज नावाच्या मुलीशी झालं होतं. पण दोघांचा घटस्फोट झाला. रिंकी ही हंसिकाची मैत्रीण होती. सोहेल व रिंकीच्या लग्नाला हंसिकाने हजेरी लावली होती. त्यामुळे हंसिकाने सोहेलशी लग्न केलं तेव्हा मैत्रिणीच्या एक्स पतीशी लग्न केल्याची टीका तिच्यावर झाली होती.