Hansika Motwani Husband Sohael Khaturiya : ‘कोई मिल गया’मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हंसिका अडीच वर्षांनी पती सोहेल खातुरियापासून विभक्त होणार आहे, असं म्हटलं जातंय. सोहेल व हंसिका दोघेही वेगळे राहत आहेत.
सोहेलपासून विभक्त होण्याच्या वृत्तांवर हंसिकाने अद्याप मौन बाळगलं आहे. हंसिकाने १८ जुलैपासून तिच्या इन्स्टाग्रामवर कोणतीच पोस्ट केलेली नाही. तसेच तिने स्टोरीही शेअर केलेली नाही. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, मागील काही काळापासून सोहेल व हंसिका वेगळे राहत आहेत.
“हंसिका तिच्या आईबरोबर राहायला गेली आहे, तर सोहेल त्याच्या आई-वडिलांबरोबर राहतो. डिसेंबर २०२२ मध्ये लग्न झाल्यानंतर हे दोघेही सोहेलच्या कुटुंबाबरोबर राहत होते. पण संयुक्त कुटुंबात त्यांना जुळवून घेता आलं नाही, त्यामुळे त्यांनी त्याच इमारतीत एक अपार्टमेंट घेतलं. पण वेगळे राहिल्यानंतरही या दोघांच्या नात्यातील समस्या सुटल्या नाहीत,” असं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने एका सूत्राच्या हवाल्याने दिलं होतं. या अपार्टमेंटमधील गृहप्रवेश व पूजेचे फोटो हंसिकाने शेअर केले होते. मात्र तेही आता तिने हटवले आहेत.
हंसिकाने हटवले पतीबरोबरचे फोटो
हंसिकाने अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तर सोहेलने हे वृत्त खोटे असल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. पण सोहेलने याबद्दल जास्त बोलणं टाळलं होतं. सोहेलच्या स्पष्टीकरणानंतरही हंसिकाच्या अकाउंटवर दोघांचे फोटो दिसत होते. पण आता तिने लग्न व इतर सर्व फोटो डिलीट केले आहेत.
हंसिका मोटवानीने ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खातुरियाशी राजस्थानमध्ये लग्न केलं होतं. सोहेल खातुरिया हा मुंबईतील बिझनेसमन आहे. सोहेलने हंसिकाला पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर प्रपोज केलं होतं. हंसिकाच्या अकाउंटवर तिच्या पतीबरोबरचे फोटो होते, जे आता तिने हटवले आहेत. काही दिवसांपूर्वी हंसिकाच्या अकाउंटवर पती सोहेलच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्ट होत्या. तसेच लग्नाचे व व्हेकेशनचे फोटोही होते. ते फोटो आता तिने डिलीट केले आहेत.
सोहेल खातुरियाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं पहिलं लग्न रिंकी बजाज नावाच्या मुलीशी झालं होतं. पण दोघांचा घटस्फोट झाला. रिंकी ही हंसिकाची मैत्रीण होती. सोहेल व रिंकीच्या लग्नाला हंसिकाने हजेरी लावली होती. त्यामुळे हंसिकाने सोहेलशी लग्न केलं तेव्हा मैत्रिणीच्या एक्स पतीशी लग्न केल्याची टीका तिच्यावर झाली होती.