Himanshu Malhotra Talks about Irfan Khan : दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनात घर केलं, त्यामुळेच आज ते हयात नसतानाही अनेकदा त्यांच्या कामाबद्दल, त्यांनी साकारलेल्या भूमिकांबद्दल बोललं जातं आणि त्यांचं यासाठी कौतुक केलं जातं. आजही प्रेक्षक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे तर कलाकार मंडळीसुद्धा अनेकदा त्यांच्या कामाचं कौतुक करतात. अशातच नुकतंच अभिनेता हिमांशू मल्होत्राने इरफान खान यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. यावेळी त्याने त्यांचा मुलगा बाबील खानबद्दलही सांगितलं आहे.
हिमाशू मल्होत्राने ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तो इरफान खान व बाबील यांच्याबद्दल बोलला आहे. तो म्हणाला, “इरफान खान यांनी जे कमावलं आहे ते कमावण्यासाठी बाबील अजून खूप वेळ आहे. इरफान यांना किती तरी वर्षे मेहनत केल्यानंतर प्रसिद्धी मिळाली. बाबीललाही धैर्य ठेवत चांगलं काम करत राहावं लागेल, त्यासाठी त्याला खूप वेळ द्यावा लागेल”.
पुढे हिमांशू म्हणाला, “इरफान खान यांनी १०-१५ वर्षे मेहनत केली, त्यानंतर कुठे ते प्रसिद्धीझोतात आले. लोकांकडून त्यांच्या कामाचं कौतुक झालं, त्यांना इतका सन्मान मिळाला. नाव कमावणं, कौतुक मिळवणं इतकं सोपं नसतं; त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. बाबीलला स्वत:ला कलेमध्ये वाहून घ्यावं लागेल, खूप मेहनत करावी लागेल.”
दरम्यान, इरफान खान यांचा मुलगा बाबीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो ‘लॉगआउट’ या चित्रपटात झळकला होता. याव्यतिरिक्त ‘द रेलवे मेन’ या नेटफ्लिक्सवरील सीरिजमध्येही तो दिसला होता. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेते आर. माधवनसुद्धा पाहायला मिळाले होते. बाबील जसलीन रॉयलच्या ‘दस्तूर’ या गाण्यामध्येही झळकला होता.