Himanshu Malhotra recalls working with Sidharth Malhotra in Shershaah : अभिनेता व अमृता खानविलकरचा पती हिमांशू मल्होत्राने सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांच्या ‘शेरशाह’सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटात त्याने मेजर राजीव कपूरची भूमिका साकारली होती. ‘स्क्रीन’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिमांशूने ‘शेरशाह’मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये त्यांनी सिनेमाचे कसे शूटिंग केले याबाबत हिमांशूने सांगितलं. तसेच सेटवर सिद्धार्थ व कियाराचं प्रेम कसं फुललं त्याबद्दल आठवणी सांगितल्या.
‘शेरशाह’ मधील भूमिका कशी मिळाली? याबद्दल हिमांशू म्हणाला, “मी कुणाल कोहलीच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते, पण तो सिनेमा मिळाला नाही. त्यामुळे मी थोडा निराश झालो. मग मी एका चित्रपटासाठी टेस्ट दिली, पण मला माहीत नव्हतं की ती ‘शेरशाह’ साठी आहे. ऑडिशनच्या पटकथेत फक्त कॅप्टन विक्रम लिहिलं होतं, बत्रा असा उल्लेख नव्हता. मी वेगळ्या झोनमध्ये होतो. तीन महिन्यांनंतर, मला एक फोन आला की धर्मा प्रॉडक्शनच्या ‘शेरशाह’ नावाच्या चित्रपटासाठी माझी निवड झाली आहे, जो १९९९ च्या कारगिल युद्धावर आधारित होता. मी या चित्रपटात मेजर राजीव कपूरची भूमिका करणार आहे.”
हिमांशूने सिद्धार्थ मल्होत्राबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितला. “सिद्धार्थबरोबर काम करणं खूप छान होतं. तो चांगला आहे. आम्ही कारगिलमध्ये होतो. मी तिथे २० दिवस शूटिंग केलं आणि तो तिथे ३०-३२ दिवस होता. आमच्याबरोबर निकितिन धीर, शिव पंडित होते, आम्ही सर्व जण एका युनिटसारखे झालो होतो. त्यावेळी काश्मीरमध्ये कलम ३७० लागू झाल्यामुळे आम्ही आमच्या मोकळ्या वेळेत एकत्र जमायचो. आम्ही कारगिलमध्ये अडकलो होतो आणि जेव्हा शूटिंग रद्द व्हायचं तेव्हा आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत म्युझिक सेशन्स करायचो, सिद्धार्थही आमच्याबरोबर असायचा,” असं हिमांशू म्हणाला.
सिद्धार्थ-कियाराचं प्रेम फुलताना पाहिलं
‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ व कियारा यांच्यातील प्रेम फुललं. त्याबद्दल हिमांशू म्हणाला, “आम्हाला त्यांच्या प्रेमाबद्दल फारशी माहिती नव्हती, पण ती फुलताना आम्हाला जाणवत होती. पालनपूरमध्ये आम्ही त्या दोघांना एकत्र पाहिलं होतं. तिथेच अंत्यसंस्काराचा सीन चित्रित झाला होता. आम्ही कियाराला फक्त तेव्हाच पाहिलं होतं, कारण त्यानंतर आम्ही कारगिलला गेलो होतो. मला वाटतं ते नुकतेच प्रेमात पडले होते. आम्ही त्यांना भेटलो, फोटो काढले आणि आम्ही सर्वजण एकत्र बसलो. मला वाटतं तिथूनच सुरुवात झाली असावी आणि मग त्यांनी चंदीगडमध्ये शूटिंग केलं, तिथेच त्यांच्यातील प्रेम फुललं.”
हिमांशूने सांगितली काश्मिरमधील शूटिंगची आठवण
हिमांशू मल्होत्राने काश्मीरमधील शूटिंगची आठवण सांगितली. “त्यावेळी शूटिंग करणं कठीण होतं, कारण तणावाचं वातावरण होतं. पण तीच एकमेव वेळ होती जेव्हा आम्ही शूटिंग करू शकत होतो. निर्मात्यांनाही माहीत नव्हतं की असं काहीतरी घडणार आहे. सुदैवाने, संरक्षण मंत्रालय, धर्मा प्रॉडक्शन आणि इतर सर्वांनी आमची काळजी घेतली. आमच्याबरोबर लष्करी अधिकारी होते, त्यांच्याशी आमचं छान बोलणं झालं. आम्ही सुरक्षित होतो आणि त्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली होती,” असं हिमांशू म्हणाला.
हिमांशू ‘केसरी वीर’मध्ये विवेक ओबेरॉयबरोबर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच हिमांशू लवकरच ‘राणा नायडू सीझन २’ मध्ये देखील झळकणार आहे.