सतत पुढे जाण्याची, कधीतरी दिवस पालटतील आपल्याला फक्त त्या दिशेने प्रयत्न करत राहायला हवेत, ही आशाच सध्या अनेकांना प्रतिकूलतेने भरलेल्या भवतालातही जगायचं, टिकून राहायचं बळ देते आहे. तुमची आशा, तुमची स्वप्नं कितीही बलदंड असली तरी त्या मार्गात उभे असलेले जातीधर्माचे, सामाजिक-आर्थिक उतरंडीचे, शासकीय उदासीनतेचे, राजकीय-शैक्षणिक अव्यवस्थेचे, भ्रष्टाचाराचे कितीतरी अडथळे पार करताना त्या जिवाची दमछाक होते. आणि मग या संघर्षातच त्याच्या जगण्याचा धागा तुटला तर तो बळी कोणाचा? ज्याच्या त्याच्या भाळी लिहिल्या गेलेल्या नियतीचा की असंवेदनशील व्यवस्थेचा, हरवलेल्या माणुसकीचा?

नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाऊंड’ हा चित्रपट पाहताना असे अनेक प्रश्न मनात घोळत राहतात. आपल्या आजूबाजूच्या वास्तवाकडे अधिक डोळसपणे पाहायला लावणारा आणि तरीही मनात निराशेच्या काजळीऐवजी किमान आपल्यापुरतं तरी उत्तर शोधायचं बळ जागवणारा असा हा भावानुभव आहे. ‘होमबाऊंड’ हा काल्पनिक चित्रपट नाही, तो सत्य घटनेवरून प्रेरित आहे.

करोनाकाळात सगळा देश ठप्प झाला होता. रस्ते सुनसान पडले होते. पण त्या मोकळ्या महामार्गांवरच्या शांततेपलीकडेही कितीतरी गोष्टी धुमसत होत्या. त्याच काळात कुठल्याशा महामार्गाच्या कडेला मांडीवर निपचीत पडलेल्या आपल्या मित्राकडे हतबलतेने पाहात असलेल्या एका तरुणाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. हे छायाचित्र पाहिल्यानंतर त्यामागची कथा शोधायची ऊर्मी बशरत पीर यांच्या मनात जागी झाली. ते छायाचित्रात दिसणाऱ्या त्या हतबल कथानायकापर्यंत पोहोचले आणि मग त्याच्या माध्यमातून उलगडत गेलेल्या दुर्दम्य जगण्याचं, भारतात मूळ धरून असलेल्या जातिव्यवस्थेचं, तथाकथित प्रगतीचं वास्तव त्यांनी ‘टेकिंग अम्रित होम’ या ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखातून उतरवलं. हे सांगण्याचं कारण म्हणजे या एका लेखातून प्रेरणा घेऊन लेखक, दिग्दर्शक नीरज घायवान यांनी ‘होमबाऊंड’सारख्या सुंदर चित्रपटाची मांडणी केली आहे.

या चित्रपटाच्या कथेचं श्रेय नीरज यांनी बशरत पीर आणि सुमित रॉय यांना दिलं आहे. पटकथा लेखनाची धुरा पूर्णपणे नीरज यांनी सांभाळली आहे तर संवादलेखन त्यांनी वरुण ग्रोवर आणि श्रीधर दुबे यांच्या मदतीने केलं आहे. एका वास्तवदर्शी लेखातून प्रेरणा घेऊन आजही देशात घट्ट मूळ धरून असलेला जातधर्माचा विद्वेष, गरीब-श्रीमंत हा भेदाभेद, शिक्षणाच्या आधारे आयुष्याचा स्तर उंचावू पाहणाऱ्या गावखेड्यांतील अनेक तरुण-तरुणींच्या वाट्याला येणारे भोग, समाजाच्या आर्थिक-सामाजिक उतरंडीत स्वत:साठी आदरयुक्त जागा निर्माण करण्यासाठीचा, आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी – टिकवण्यासाठीचा झगडा अशा कित्येक खऱ्या मुद्द्यांना स्पर्श करत दोन मित्रांची कथा नीरज घायवान यांनी जिवंत केली आहे.

बशरत पीर यांच्या मूळ लेखातील घटना ही करोना आणि टाळेबंदीच्या काळातील आहे. मात्र, टाळेबंदीमुळे उध्वस्त झालेल्या त्या एका क्षणापर्यंत पोहोचण्यापूर्वी उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावात लहानाच्या मोठ्या झालेल्या मोहम्मद शोएब अली आणि चंदन कुमार या दोन तरुणांचं आयुष्य नेमकं कसं होतं? त्या दोघांची स्वप्नं, त्यांच्या आशाआकांक्षा, त्यांचे स्वभाव, त्यांची मैत्री, त्यांचं सामाजिक – आर्थिक वास्तव या सगळ्यातून उमलत असलेल्या त्यांच्या गोष्टीचा धागा पकडून नीरज घायवान यांनी कथामांडणी केली आहे.

चित्रपटाची सुरुवातच पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी महत्प्रयासाने रात्रभर टेम्पोतला प्रवास करून रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या शोएब आणि चंदनपासून होते. शोएब मुस्लीम आणि चंदन दलित आहे म्हणून… दोघांच्याही वाट्याला आजवर हेटाळणीने भरलेल्या अनुभवांचंच गाठोडं आलं आहे. आपल्या शरीरावर एकदा पोलिसाचा गणवेश चढला की कोणीही आपला अपमान करू धजावणार नाही. ते ‘सन्मान’युक्त आयुष्य मिळवण्यासाठी पोलीस भरतीची परीक्षा द्यायला निघालेले दोघंही स्टेशनवर आपल्यासारख्याच परीक्षा देण्यासाठी चाललेल्या असंख्य मुला-मुलींची झुंबड पाहून एक क्षण धास्तावतात. त्या वेळी परीक्षा द्यायला चाललो आहोत की युद्ध करायला? असा संवाद चंदनच्या तोंडी आहे.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग… अशी कित्येकांची अवस्था आहे. पोलीस भरती परीक्षेचा निकाल वर्षानुवर्षे रखडून राहतो, मधल्या काळात दोन्ही पायांनी चालता येत नाही म्हणून शेतातच जाऊ न शकणाऱ्या शोएबच्या वडिलांना तातडीने गुडघारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी किमान अडीच लाख रुपये खर्च आहे. तर पडकं घर, गळकं छप्पर दुरुस्त करून चांगल्या पक्क्या घरात राहता यावं म्हणून चंदनची आई, बहीण आणि वडील दिवसरात्रं मिळेल ते काम करतायेत. चंदनने पुढे शिकावं हा त्यांचा आग्रह आहे.

दोघांच्याही समस्या वरकरणी वेगळ्या दिसल्या तरी मूळ एकच. एका क्षणी दोघं हा खर्च उचलण्यासाठी काम करायचं ठरवतात. सुरतला कपड्यांच्या फॅक्टरीत काम करू लागतात आणि मग करोनामुळे पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यालाच जणू टाळेबंदी लागते. इथून पुढे काय होतं? हा सगळा कथाप्रवास खरोखरच ‘होमबाऊंड’ पाहूनच अनुभवायला हवा.

अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने कथेची मांडणी करत जातिभेद नाही, सगळ्या देशात-गावखेड्यांतही ‘अच्छे दिन’ आलेले आहेत हा आपण सगळ्यांनीच पांघरलेला भ्रमाचा बुरखा दिग्दर्शक टराटरा फाडत जातो. मात्र, चित्रपटाची मांडणी इतकी सहज ओघवत्या पद्धतीची आहे की इथे इतर कोणावर दोष ठेवण्याऐवजी आपण स्वत:च आपल्या आतले गुंते सोडवत जातो.

आतले आणि बाहेरचे या संघर्षात… आपल्याला चुकून आतले म्हणून प्रवेश मिळाला की आपण त्यात रमून जातो. मग बाहेरच्यांचं दु:ख कळलं तरी एका मर्यादेबाहेर आपण परिस्थिती बदलण्यासाठी काहीही करत नाही. दु:ख, अडचणी जोपर्यंत आपल्या उंबरठ्यावर येत नाहीत तोपर्यंत आपण आपल्याच कोषात मग्न राहतो. मग शोएब आणि चंदनसारखे तरुण कितीही हुशार असले, ध्येयवादी असले, दुर्दम्य जिद्द आणि प्रचंड आशावाद बाळगून असले तरी त्यांना पुढे आणण्यासाठी कोणीच हात पुढे करत नाही.

आंबेडकरांचे विचार, त्यांची तसबीर घरात लावून आपली जात न लपवणारे, आपल्यापेक्षा किंचित आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या सुधा आणि तिचं कुटुंब पाहून थोडा का होईना चंदनच्या जिवात जीव येतो. सतत धार्मिक विटंबनेला सामोरं जावं लागतं म्हणून आपलं घर, आपली माणसं, माती सोडून दुबईला जाण्याचा विचार शोएबला सहन होत नाही. तो इथेच आणखी जोराने अस्तित्वाची लढाई लढत राहतो. दिग्दर्शक नीरज घायवान यांनी राखेतून उभं राहण्याची त्यांची ही जिद्दं, कुठलाच भेदाभेद नसलेली त्यांची घट्ट, निखळ मैत्री केंद्रस्थानी ठेवून केलेला ‘होमबाऊंड’ कुठेच निराश करत नाही.

उत्तम दिग्दर्शकीय मांडणीला ईशान खत्तार आणि विशाल जेठवा या दोघांच्या सहज अभिनयाची जोड मिळाली आहे.

अतिशय संयमाने समोरच्यांच्या हेटाळणीला सामोरं जाणारा शोएब एका क्षणी आपला रागही व्यक्त करतो आणि हिंसकही होत नाही. हा रागाचा एक क्षण आणि सगळा अपमान-निराशा आतल्या आत दडवून अस्वस्थपणे चंदनसमोर येणारा आणि त्याच्याच कुशीत रडून मोकळा होणारा खंबीर, हळवा शोएब ईशानने खूप छान रंगवला आहे. विशाल जेठवानेही चंदनची व्यक्तिरेखा आपल्या शैलीत जिवंत केली आहे. चंदन खूप हळवा आहे, तो आतून तितकाच कणखरही आहे, काहीसा अबोल आहे पण तितकाच स्वाभिमानी आहे.

जान्हवी कपूरच्या वाट्याला फारसे प्रसंग आलेले नाहीत. आणखी एक प्रसंग चंदनच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शालिनी वत्स यांनी अविस्मरणीय साकारला आहे. हुंदका दाटून येतो म्हणजे नेमकं काय… अत्यंत ताकदीने त्यांनी ही आई रंगवली आहे. एखादीच कलाकृती आपल्याला आतून खरवडते, नि:शब्द करते, प्रसंगी निरुत्तरही करते पण अवघड परिस्थितीतही सन्मानाने जगण्याचं भान आणि बळ गरजेचं असतं याची जाणीवही करून देते. ‘होमबाऊंड’ हा अशी अनुभूती देणाऱ्या कलाकृतीपैकी एक आहे.

होमबाऊंड

दिग्दर्शक – नीरज घायवान

कलाकार – ईशान खत्तार, विशाल जेठवा, जान्हवी कपूर, शालिनी वत्स, विजय विक्रम सिंग, चंदन आनंद.