Bollywood : नमक हराम हा चित्रपट १९७३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने इतिहास घडवला, याचं कारण होतं हृषिकेश मुखर्जी. हृषिदांनी तोपर्यंत विनोदी कथा किंवा हलकेफुलके चित्रपट केले होते. मात्र पहिल्यांदाच त्यांनी कंपनीतल्या राजकारणावर भाष्य केलं होतं. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन असे दोन नट त्यात होते. त्यातला राजेश खन्ना हा सुपरस्टार होता तर अमिताभ बच्चन यांचा उदय सुपरस्टार होणं म्हणून बाकी होतं.
कुठल्या चित्रपटाचा रिमेक होता नमक हराम?
१९६४ मध्ये आलेल्या Becket या चित्रपटाचा रिमेक म्हणजे नमक हराम. समाजवाद आणि भांडवलशाही यांच्यातला लढा चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला होता. मैत्री, माणुसकी, आपुलकी, आदर्श आणि मानवी मूल्यं यांचं चित्रण या सिनेमात होतं. हृशिकेश मुखर्जींनी आनंद चित्रपटातली जोडी या चित्रपटात पुन्हा आणली म्हणजे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन. अनेकदा हे सांगितलं जातं की अमिताभ बच्चन यांचा सुपरस्टार म्हणून उदय झाला तो जंजीर चित्रपटातून. मात्र अमिताभ बच्चन यांचा उदय झाला तो नमक हराममधून. राजेश खन्ना तोपर्यंत सुपरस्टार होतेच. पण त्यांच्या या बिरुदात कुणाचाही वाटा नव्हता. पण यानंतर नवा सुपरस्टार जन्माला होता ज्याचं नाव होतं अमिताभ बच्चन.
चित्रीकरण सुरु झालं तेव्हा अमिताभ सुपरस्टार नव्हते
चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं तेव्हा राजेश खन्ना हे सुपरस्टार होते. जंजीर चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. तसंच आनंद चित्रपटात राजेश खन्ना यांचा अभिनय पाहून अमिताभ बच्चन तर त्यांच्यापुढे काहीच नाही असं सगळ्यांनाच वाटलं होतं. नुकतंच एका मुलाखतीत रझा मुराद यांनी सांगितलं की राजेश खन्नाची एक झलक पाहण्यासाठी दोन-दोन हजार मुली सेटवर असत. रझा मुराद यांनीही या चित्रपटात एक उत्तम भूमिका वठवली होती. ते म्हणाले राजेश खन्ना यांची जादू अशी होती की संपूर्ण जग कुठल्याही पीआरच्या शिवाय त्यांच्या प्रसिद्धीबाबत अप्रुप बाळगून होतं. त्या काळात जाहिराती नव्हत्या, टीव्ही नव्हते, फक्त चित्रपट होते तरीही राजेश खन्ना नावाचं गारुड सगळ्यांना भुरळ घालत होतं. असंही रझा मुराद यांनी सांगितलं. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोघंही या चित्रपटात जिगरी दोस्त असतात. पण मग सोमू (राजेश खन्ना) आणि विकी (अमिताभ बच्चन) यांच्यात कंपनीतल्या कामगारांवरुन टोकाचे संघर्ष होतात. सोमू कामगारांच्या बाजूने उभा राहतो. सोमूची हत्या होते आणि आपल्याला अपेक्षित नसतानाही विकी सगळा दोष स्वतःकडे घेतो आणि तुरुंगात जातो अशी या चित्रपटाची कथा होती. या दोघांमधला जो संघर्ष दाखवण्यात आला आहे जे काही घडतं त्यात अमिताभ बच्चन ज्या सफाईने वावरले आहेत त्याला खरंच जवाब नाही.

राजेश खन्ना नमक हराम पाहून काय म्हणाले होते?
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी राजेश खन्ना यांनी चित्रपटाचा प्रीमियर पाहिला आणि बाहेर येऊन म्हणाले “आज दुसरा सुपरस्टार पैदा हो गया” असा किस्सा सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांनी सांगितला होता. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात जी भूमिका केली ती राजेश खन्ना यांच्या भूमिकेपेक्षा वरचढ ठरली. त्याचीच खंत राजेश खन्ना यांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर जंजीर आला आणि चित्रपटसृष्टीला अमिताभ बच्चन नावाचा झंझावाती सुपरस्टार मिळाला. पुढची २० वर्षे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरशः राज्य केलं. नमक हराममध्ये पडद्यावरचा क्लायमॅक्स जसा घडला तसाच तो अमिताभ आणि राजेश खन्ना यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही घडला. एका सुपरस्टारने दुसऱ्याला सुपरस्टारला उदयाला येताना पाहिलं. अशा रितीने एके काळी फ्लॉपचा शिक्का बसलेले अमिताभ बच्चन हे सुपरस्टार झाले. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
क्लायमॅक्सबाबत दोन्ही अभिनेत्यांना कल्पना दिली नव्हती
हृशिदांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं चित्रपटाचा क्लायमॅक्स काय असेल? याची कल्पना मी आधी दोघांनाही दिली नव्हती. गुलजार यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती त्यामुळे त्यांना आणि मलाच याची कल्पना होती. Becket स्टोरीलाईन प्रमाणे आम्ही गेलो असतो तर अमिताभची म्हणजेच विक्कीची हत्या होते असं दाखवण्यात आलं असतं. आम्ही यात बरोबर उलट प्रयोग केला होता. याचं कारण होते राजेश खन्ना. राजेश खन्ना यांना जेव्हा हे कळलं की विक्कीचा मृत्यू सोमूच्या हातून होतो तेव्हा ते उदास झाले होते. कारण चित्रपटातील नायकाचा मृत्यू झाला तर लोक त्यावर कांकणभर जास्त प्रेम करतात हे राजेश खन्ना यांना ठाऊक होतं. त्यामुळे नमक हरामचा शेवट आम्ही बदलला. राजेश खन्ना हे तेव्हा सुपरस्टार होते त्यामुळे त्यांचं ऐकण्यावाचून गत्यंतर नव्हतं. गुलजार यांनीही हेच सांगितलं की आम्ही चित्रपटाचा शेवट बदलला कारण राजेश खन्ना यांची ती इच्छा होती.
अमिताभ बच्चनही झाले नाराज
राजेश खन्ना यांनी लक्ष घालून चित्रपटाचा शेवट बदलला हे कळल्यावर अमिताभही तेव्हा नाराज झाले होते. तसंच हे आपल्यापासून का लपवलं गेलं? याचंही त्यांना वाईट वाटलं गेलो होतं. दिग्दर्शकाने आपला विश्वासघात केला अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. याबाबतही हृशिदा म्हणाले होते की हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जो चित्रपटाचा नायक हा चित्रपटात मेला तर तो हिरो होतो. मी त्याच पद्धतीने अमिताभचं पात्र रंगवलं होतं आणि त्याला वाटलं की मी त्याचा विश्वासघात केला. या चित्रपटानंतर तो अनेक दिवस माझ्याशी बोलत नव्हता अशीही आठवण हृशिदांनी सांगितली होती. शिवाय यानंतर घडलं असं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यात मतभेद झाले आणि ते इतके टोकाला गेले की दोघांनी पुन्हा एकत्र चित्रपट करायचा नाही असा निर्णय घेतला.
प्रशांत रॉय यांनी काय सांगितलं ?
राजेश खन्ना यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या प्रशांत रॉय यांनी सांगितलं की त्या दिवसांमध्ये काकाजी (राजेश खन्ना) अमिताभ बच्चन यांच्यावर चांगलेच नाराज झाले होते आणि संतापलेलेही होते. राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्यावर रोज पार्ट्या होत असत त्यावेळी ते कायम सांगायचे हृषिकेश मुखर्जी माझे आवडते दिग्दर्शक आहेत पण अमिताभ बच्चन त्यांचे कान भरतो आहे. अमिताभ बच्चनने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माझ्याशी घाणेरडं राजकारण केलं. मी २० वर्षे काकांजीसह काम केलं आहे. मी कधीही अमिताभ बच्चन यांना आशीर्वाद बंगल्यावर आले आहेत असं पाहिलं नाही. नमक हरामच्या आधी हृषिकेश मुखर्जी आशीर्वाद बंगल्यावर यायचे. पण या चित्रपटानंतर त्यांचं येणंही बंद झालं. मात्र ही गोष्टही मान्य करावी लागेल की अमिताभ बच्चन यांनी कधीही राजेश खन्ना यांच्या विरोधात कुठलीही गोष्ट बोलून दाखवली नाही. राजेश खन्ना यांनी नमक हराम मध्ये साकारलेल्या सोमूचा मृत्यू अचानक होतो. त्यात आनंद चित्रपट किंवा सफर चित्रपटासारखी नाट्यमयता नाही. अरे राजेश खन्ना गेला आहे हे लक्षात येईपर्यंत अमिताभ बच्चन यांनी पडदा व्यापून टाकला होता. त्यामुळेही कदाचित ही खंत राजेश खन्ना यांच्या मनात कायम राहिली असावी.