गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे. राहुलने क्रिकेटर विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे असं सांगितलं होतं. विराटने ब्लॉक का केलं आहे याच कारण त्याने द्यावं असं राहुलचं म्हणणं होतं. तर याबाबात तो गेल्या काही दिवसांपासून पापाराझींशी संवाद साधताना दिसला. परंतु, या दरम्यान राहुलने विराट कोहलीच्या चाहत्यांबद्दलही वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
विराटने ब्लॉक केल्यानंतर राहुल सोशल मीडियामार्फत म्हणाला, “विराटचे चाहते त्याच्यापेक्षाही मोठे जोकर आहेत,” यामुळे राहुल व त्याच्या कुटुंबीयांनाही विराटच्या चाहत्यांनी ट्रोल केल्याचं त्यानं सांगितलं होतं. यादरम्यान राहुल, त्याची पत्नी, बहीण व मुलीलाही विराटच्या चाहत्यांनी ट्रोल केल्याचं राहुलने सांगितलं. अशातच आता राहुलने नुकतीच एक पोस्ट केली आहे. राहुलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केल्याचं स्पष्ट केलं आहे.
राहुल इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत म्हणाला, “विराट कोहली, मला अनब्लॉक केल्याबद्दल धन्यवाद; तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहात आणि तुम्ही भारताचा गर्व आहात. देव तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना सुखात ठेवो.” यासह त्यानं अजून एक पोस्ट केली असून यामध्ये त्यानं त्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहेत. तो म्हणाला, “ज्यांनी मला, माझ्या पत्नीला, बहिणीला ट्रोल केलं, माझ्या लहान मुलीच्या फोटोंचा दुरुपयोग केला, देव त्यांना सदबुद्धी देवो. मीसुद्धा तुमच्याबद्दल तसंच किंबहुना त्याहीपेक्षा वाईट लिहू शकतो, पण त्याने केवळ नकारात्मक्ता निर्माण होईल.”
पुढे या पोस्टमध्ये राहुलने विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीबद्दलही वक्तव्य केलं आहे. राहुलने विराटबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याची चर्चा झाली होती. यादरम्यान विराटचा भाऊ विकास कोहलीनेही राहुल प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं करत असल्याचं म्हटलं होतं. विकास कोहलीबद्दल बोलताना राहुल म्हणाला, “विकास दादा, तुम्ही मला जे काही बोललात त्याचं मला वाईट वाटलं नाही, मला माहीत आहे तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात आणि आपण मेनचेस्टरमधील ओव्हल स्टेडियममध्ये असताना तुम्ही माझ्या गायनाचं कौतुक केल्याचं मला आठवतं.”
दरम्यान, राहुल वैद्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या ‘लाफ्टर शेफ’ या ‘कर्लस’ वाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी झाला आहे. यामधून त्यानं मध्यंतरी कुटुंबीयांसह वेळ घालवण्याकरता ब्रेकही घेतला होता. तर तो व त्याची पत्नी अभिनेत्री दिशा परमार ओ.टी.टी.वरील एका सीरिजमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.