स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (१५ ऑगस्ट) संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी झेंडावंदन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलीवूडसह मराठी कलाकारांनीसुद्धा आपल्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच अनेक कलाकारांनी झेंडावंदन कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.
अशातच एका बॉलीवूड अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमधील तिच्या कृतीमुळे ती टीकेची धनी बनली आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी तिच्या एका व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे.
‘इंस्टंट बॉलीवुड’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शमिता शेट्टी, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीची मुलगी आणि इतर काही लोक आहेत. यावेळी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत सुरू आहे. मात्र, राष्ट्रगीत सुरू असताना शमिता एक जागी शांतपणे उभी न राहता, हालचाल करताना आणि इकडे-तिकडे पाहत असल्याचं दिसतं आहे. तिची ही वागणूक अनेकांना खटकली आहे.
“शमिताला राष्ट्रगीताच्या वेळी कसं उभं राहायचं याचे नियम माहिती नाहीत का?”, “शमिता काय करण्याचा प्रयत्न करतेयस? उगाच कुल दिसायचा प्रयत्न करू नको, शोभत नाही”, “अशा प्रकारची देशभक्ती करू नका, ज्यात राष्ट्रगीताचा सन्मान कसा करावा हेच माहिती नाही. ढोंगी देशप्रेम बंद करा”, “शमिता शेट्टीने राष्ट्रगीताच्या वेळी ज्या प्रकारे उभी राहिली, त्यातून तिने राष्ट्रगीताचा अपमान केल्याचं दिसत आहे”, “कमीत कमी राष्ट्रगीत चालू असताना तरी एक जागी शांतपणे उभं राहावं – एवढीच अपेक्षा आहे. एका दिवसापुरतं देशप्रेम दाखवणाऱ्यांनी थोडा तरी आदर ठेवावा”, “अशा गोष्टींवरून हे पुन्हा सिद्ध होतं की, हे फक्त कलाकार आहेत – राष्ट्रध्वजाचं आणि त्याच्या सन्मानाचं महत्त्व यांना खरंच माहिती आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे.” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी शमिताच्या वागण्यावर टीका केली आहे.
दरम्यान, या व्हिडीओमधील शिल्पा शेट्टीच्या लहान मुलीचं अनेकांकडून कौतुक होत आहे. लोक म्हणत आहेत की, “शमितापेक्षा शिल्पाची छोटी मुलगी जास्त शिस्तीत आणि आदराने राष्ट्रगीतावेळी उभी आहे.”. शमितापेक्षा लहान मुलीची कृती कौतुकास्पद असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.