साऊथचे सुपरस्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांनी २०१३ मध्ये सर्वोत्तम क्राईम थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम’ आणला होता. त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार झाला आणि त्यात अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचे दोन्ही भाग तुफान हिट झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवला. काही दिवसांपूर्वी याच्या तिसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली.
या चित्रपटाचा हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी अजय देवगणच्या या चित्रपटाचा कोरियन भाषेतही रिमेक होणार अशी बातमी समोर आली होती. अशातच आता ‘दृश्यम’च्या हॉलिवूडमधील रिमेकबद्दल नवी माहिती समोर आली आहे. पॅनोरोमा स्टुडिओजनी गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि जॉट फिल्म्स यांच्याबरोबर हा चित्रपट हॉलिवूडमध्ये रिमेक करण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
आणखी वाचा : जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी; किस्सा जाणून घ्या
बॉलिवूड चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक होत असल्याचं वृत्त चाहत्यांना सुखावणारं आहे. या चित्रपटाची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर चीनमध्येदेखील या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. इतकंच नव्हे तर हॉलिवूड रिमेकबरोबरच या चित्रपटाचं स्पॅनिश भाषेतही डबिंग केलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पॅनोरोमा स्टुडिओचे चेअरमन व डायरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी याविषयी माहीती दिली आहे.
‘दृश्यम’चा पहिला भाग २०१३ मध्ये आला होता, जो जीतू जोसेफ याने लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. नंतर या चित्रपटाचा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला. हिंदीमधील रिमेकमध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना यांनी काम केलं आहे. मूळ मल्याळम भाषेबरोबरच इतर भाषांमधील रिमेकलासुद्धा प्रेक्षकांचं उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अन् या हॉलिवूड रिमेकची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.