अभिनेते जॅकी श्रॉफ आणि पत्नी आयशा श्रॉफ यांनी २००३ मध्ये आलेल्या ‘बूम’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण अमिताभ बच्चन, कतरिना कैफसारखे कलाकार असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. या चित्रपटामुळे जॅकी व आयशा कर्जात बुडाले. मात्र, चित्रपट निर्मितीपूर्वी या जोडप्याने १९९५ मध्ये एक गुंतवणूक केली होती, त्याचा भविष्यात या जोडप्याला खूप फायदा झाला व त्यातून चांगला परतावा मिळाला, असं आयशाने सांगितलं.
आयशाने झिरो 1 हसल या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्या गुंतवणुकीबद्दल सांगितलं. “भारतात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन चॅनेल लाँच करण्याची तयारी सुरू होती. तो एक विलक्षण अनुभव होता. मी पहिल्यांदाच एक कॉर्पोरेट रचनेमध्ये सुरुवातीपासून सहभागी झाले होते. माझा असा पहिलाच अनुभव सोनीसारख्या मोठ्या चॅनेलबरोबर होता,” अशी आठवण आयशाने सांगितली.
वर्षभर घेतली मेहनत
“आमचा सात जणांचा एक गट होता. माझा पती लोकप्रिय असल्याने त्याचा फायदा झाला. आमच्याकडे एक बँकर, एक टेलिव्हिजन जाणकार आणि एक कॉम्प्युटरमध्ये पारंगत असलेला माणूस असे लोक होते. ग्रुपमधील सर्वांची कौशल्ये वेगवेगळी होती. आम्ही वर्षभर त्यावर काम करत होतो. तो अनुभव खूप रोमांचक होता, करारासाठी चर्चा करणे, लोकांना भेटणे, कागदपत्रे गोळा करणे अशी खूप मेहनत आम्ही घेतली होती,” असं आयशा म्हणाली.
ती एक पार्टी अन् करारावर झाल्या सह्या
आयशाने आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी एक पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला बरेच बॉलीवूड सेलिब्रिटीही आले होते. या पार्टीनंतर डील फायनल झाली होती. “सोनी मोठा ब्रँड आहे, म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या मागेही बरेच मोठे ब्रॅण्ड आणि बिझनेस हाऊस होते. त्यामुळे ते आमच्या करारावर स्वाक्षरी करायला तयार नव्हते. मग एके दिवशी मी माझ्या पतीला म्हणाले आपण एक पार्टी आयोजित करू आणि सर्वांना आमंत्रित करू. या पार्टीला खूप सेलिब्रिटी आले होते. पार्टी या डीलसाठी चांगला पर्याय आहे असं डोक्यात आलं आणि मी पार्टी आयोजित केली”, असं आयशा म्हणाली.
त्या पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी करारावर सह्या झाल्या. “त्या वेळी आम्ही मरीन ड्राइव्हवरील RG’s नावाच्या क्लबमध्ये पार्टी आयोजित केली होती. ती रात्र खूपच वेगळी होती. सकाळी ६ वाजता पार्टी संपली आणि लॉस एंजेलिसमधून आलेला बॉस म्हणाला, ‘आम्ही या ग्रुपबरोबर करारावर सह्या करतोय. आम्ही दुसऱ्याच दिवशी कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या,” असं आयशा म्हणाली.
सोनीमधील गुंतवणूक व परताव्याबद्दल आयशा म्हणाली, “मनोरंजन हे डील आणि कागदपत्रांबद्दल नाही; तर लोकांबद्दल आहे. आम्ही सोनीला लोक दिले. ती आम्ही केलेली सर्वोत्तम गुंतवणूक होती आणि त्या डीलमधून आम्हाला खूप फायदा झाला.”
परताव्याबद्दल आयशा श्रॉफ म्हणाली…
गुंतवणुकीचा परतावा २०० टक्क्यांच्या जवळपास होता का? असं विचारल्यावर आयशा म्हणाली, “खूप जास्त.” जर तुम्ही त्या करारात १०० रुपये गुंतवले असते, तर शेवटी तुम्हाला किती परतावा मिळाला असता? असं होस्टने विचारलं. “परतावा खूप जास्त होता. त्या कराराच्या संकल्पनेबद्दल बोलायचं झाल्यास त्यावेळी एक लाख गुंतवून त्यातून १०० कोटी परतावा मिळणं एवढी मोठी गोष्ट होती,” असं आयशाने सांगितलं.