अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अभिनेत्रीने नुकतीच लल्लनटॉपच्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी आई श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे जान्हवीवर काय परिणाम झाला, ती धार्मिक गोष्टींकडे कशी वळली याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

श्रीदेवी अतिशय धार्मिक होत्या याबद्दल सांगताना जान्हवी म्हणाली, “ती अशा गोष्टींवर विचार करायची ज्याचा कोणीही कधीच विचार देखील केला नसेल. काही विशेष तारखांना विशिष्ठ कामं करून घ्यावीत यावर तिचा खूप विश्वास होता. ‘शुक्रवारी केस कापू नयेत कारण, त्यामुळे लक्ष्मी घरात येत नाही’ आणि ‘शुक्रवारी काळे कपडे घालणं टाळावं’ अशा बऱ्याच गोष्टींवर तिचा विश्वास होता. पण, मी यावर कधीच विश्वास ठेवला नाही.”

हेही वाचा : “मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

जान्हवी पुढे म्हणाली, “तिच्या निधनानंतर मला या सगळ्या गोष्टी जाणवू लागल्या. ती हयात असताना मी एवढी धार्मिक होते की नाही मला खरंच माहिती नाही. पण, आता आम्ही तिच्यासाठी या सगळ्या प्रथा पाळतो. कारण मम्मा हे सगळं काही फॉलो करायची. ती गेल्यावर मी तुलनेने जास्त धार्मिक अन् श्रद्धाळू झाली आहे.”

जान्हवी कपूर वारंवार आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात भगवान बालाजीच्या दर्शनासाठी जात असते. या मंदिरात जाण्याबद्दल अभिनेत्री सांगते, “माझ्या आईच्या तोंडात नेहमी नारायण, नारायण, नारायण हा जप असायचा. जेव्हा ती इंडस्ट्रीत सक्रिय होती त्यावेळी शूटिंगमधून वेळ काढून आवर्जून प्रत्येक वाढदिवसाला तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जायची. लग्नानंतर ती फारशी मंदिरात गेली नव्हती. त्यामुळे तिच्या निधनानंतर प्रत्येक वाढदिवसाला तिरुपतीला जाण्याचा निर्णय मी घेतला. पहिल्या वर्षी जेव्हा मी मंदिरात गेले तेव्हा खूप भावुक झाले होते. पण, त्याक्षणी मला खूप जास्त मानसिक समाधान सुद्धा मिळालं”

हेही वाचा : Video : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी इटलीला निघाले रणबीर-आलिया; विमानतळावर गोंडस राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

“मी ज्या ज्या ठिकाणी मुलाखती देते प्रत्येकवेळी दोन ते तीन वाक्यांनंतर माझ्या तोंडात मम्माचं नाव येतं. त्यामुळे ती अजून माझ्याबरोबरच आहे असं मला वाटतं. ती कुठेतरी बाहेर गेलीये, प्रवासात आहे आणि परत नक्की येईल असं मला वाटतं. मी तिच्या खूप जास्त जवळ होते” असं जान्हवी कपूरने सांगितलं.