अभिनेत्री काजोल (Kajol) आणि तिची बहीण तनिषा (Tanishaa) या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांच्या मुली आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी यापूर्वी सांगितले होते की, अभिनय ही त्यांची आवड नव्हती, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागला. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना खूप मेहनत करावी लागली, कारण त्यांना घर आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. ही संघर्षमय परिस्थिती पुढेही सुरू राहिली, तनुजा आणि त्यांचे पती शोमू मुखर्जी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तनुजांवर त्यांची दोन्ही मुली – काजोल आणि तनिषा यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आली.

तनुजा यांच्या मुलींनाही त्यांच्या आईच्या सतत कामानिमित्त घराबाहेर राहण्याची सवय झाली. मात्र, अलीकडील एका मुलाखतीत तनिषाने सांगितले की, माझी इच्छा होती की माझी आई जर काम न करता घरी आमच्याजवळ राहायला हवी होती असे वाटते. तिने हेही म्हटले की, महिलांनी किमान पाच वर्षे आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित करून नंतरच काम करावे.

Hautterfly ला दिलेल्या एका मुलाखतीत तनिषाने सांगितले, “माझी आई आम्ही लहान असताना कामावर जात असे, जर ती कामावर न जाता आमच्याजवळ राहिली असती तर चांगलं झालं असतं. जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा आमच्याकडे पुरेसं आर्थिक स्थैर्य नव्हतं, त्यामुळे आईला काम करावं लागलं. ती दिवसाला दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करत असे. त्यामुळे मला आईला भेटण्याची संधीच मिळत नसे. यामुळे मी तिच्या खोलीत झोपत असे, कारण त्यामुळे मला तिच्या जवळ असल्यासारखं वाटायचं.”

“फक्त आईच मुलाला योग्य प्रकारे वाढवू शकते”

तनिषा पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की महिलांनी आपल्या मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं, कारण फक्त आईच योग्य प्रकारे मुलांचे संगोपन करू शकते. तिच्यासारखं दुसरं कोणीही मुलाला प्रेम आणि योग्य संस्कार देऊ शकत नाही. हे शाळेतून, नॅनीकडून किंवा नोकरांकडून मिळणार नाही. त्यामुळे मी ‘मुलाला सोडून जाऊन काम करा’ या विचारसरणीची समर्थक नाही. जर तुम्ही मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला असेल, तर किमान पहिले पाच वर्षं तुमच्या मुलांसाठी द्यायला हवीत. त्यानंतर तुम्हाला जे करायचं असेल ते करा. मी माझ्या आईबाबत खूप भावनिक आहे. तिची कायम उणीव भासत असल्यामुळे ती जिथं असेल तिथं मी तिच्या जवळ राहायचे. आजही मी माझ्या आईला चिकटून राहते.”

“सिंगल मदर असणं सोपं नसतं”

SCREEN ला दिलेल्या एका मुलाखतीत तनिषाने सांगितले होते की, “माझी आई एक काम करणारी सिंगल मदर होती. सिंगल मदरसाठी हे आयुष्य खूप कठीण असतं. त्यांना घर चालवायचं असतं आणि बाळाचीही काळजी घ्यायची असते. मात्र, आमच्यासाठी नशिबाने आम्ही संयुक्त कुटुंबात वाढलो. आम्हाला आजी आणि पणजीने सांभाळलं, त्यामुळे आमचं संगोपन तीन पिढ्यांनी केलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आईने आम्हाला योग्य संस्कार दिले”

ती पुढे म्हणाली, “आम्ही एक अगदी सामान्य कुटुंबातून आलो आहोत. माझी आई एक अत्यंत सामान्य व्यक्ती आहे. ती एक टिपिकल भारतीय आई आहे. तिने आम्हाला योग्य संस्कार दिले, शिस्त लावली, पण त्याचवेळी आमच्यावर प्रेमही केलं. तिच्यासाठी शिस्त फार महत्त्वाची होती. नीट वागणं, लोकांशी सुसंवाद साधणं, आदराने वागणं याला ती खूप महत्त्व द्यायची. त्यामुळे जर हेच ‘नॉर्मल’ असेल, तर आम्हीही एक नॉर्मल कुटुंब आहोत. माझी आई आम्हाला नेहमी योग्य वर्तन शिकवायची आणि त्यावर ती ठाम होती.”