Kajol Trolled Ajay Devgn : अभिनेता अजय देवगण लवकरच त्याच्या ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासह यामध्ये मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरही मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. सध्या दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘पेहला तू दुजा तू’ हे गाणं प्रदर्शित झालं. परंतु, या गाण्यामुळे मात्र अभिनेता ट्रोल झाला. अशातच आता प्रेक्षकांसह अभिनेत्री काजोलनेही अजयच्या या गाण्याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे.

अजय देवगण व मृणाल ठाकूर यांचा ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट येत्या २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अशातच नुकतंच प्रदर्शित झालेलं यातील ‘पेहला तू दुजा तू’ या गाण्यातील हुक स्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या गाण्यात ‘पेहला तू दुजा तू, तिजा तू चौथा तू’ ही ओळ आहे; यावर अजय व मृणाल हाताच्या बोटांनी हुक स्टेप करताना दिसत आहेत, यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर कमेंट करत त्यांना ट्रोल केलं. तर या गाण्यातली त्यांची हुक स्टेप सध्या व्हायरल होत आहे.

काजोलनेही आता अजय देवगणच्या गाण्याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘फ्री प्रेस जनरल’च्या वृत्तानुसार काजोल म्हणाली, “मला असं वाटतं, अजय इंडस्ट्रीतील सर्वोत्तम डान्सर आहे, कारण तो एकमेव असा व्यक्ती आहे जो त्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून नाचू शकतो.” पुढे अभिनेत्री म्हणाली, “आधी असं होतं की तो चालत यायचा आणि त्यानुसार म्युझिक असायचं, आता तर तो नाचताना फक्त बोटांचा वापर करत आहे. एक दोन, तीन चार असा.” काजोल पुढे गमतीत म्हणाली, “मला असं वाटतं, तो आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात हुशार डान्सर आहे.”

‘पेहला तू, दुजा तू’ या गाण्यातील हुक स्टेप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, कारण यामध्ये अजय व मृणाल फक्त त्यांच्या हाताच्या बोटांचा वापर करत ती हुक स्टेप करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘सन ऑफ सरदार २’ च्या ट्रेलर लॉन्चला अजय दवगणने स्वत: याबाबत त्याची प्रतिक्रिया दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय देवगण म्हणाला, “तुम्ही लोक माझी मस्करी करत आहात, पण माझ्यासाठी हे एवढं करणंसुद्धा खूप कठीण होतं; तरी ते मी केलं त्यासाठी तुम्ही आभारी असायला हवं.” दरम्यान, ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट २५ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून आज शुक्रवारी ११ (जुलै) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.