कंगना रणौतने अद्याप लग्न केलेलं नाही, पण तिचं नाव हृतिक रोशनसह इतरही काही जणांशी जोडलं गेलं. कंगनाला दुसऱ्यांचे संसार मोडणारी, विवाहित पुरुषांच्या मागे लागणारी, असं म्हटलं जातं. या आरोपांवर उत्तर देताना कंगनाने महत्त्वाकांक्षी महिलांना समाज अशा प्रकरणात कसा दोषी ठरवतो, ते सांगितलं.
कंगना विवाहित पुरुषांच्या मागे लागते, असे आरोप तिच्यावर होतात. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत तिने या आरोपांवर उत्तर दिलं. “जेव्हा तुम्ही तरुण आणि महत्त्वाकांक्षी असता, तेव्हा एखादा विवाहित पुरुष तुमच्याशी फ्लर्ट करतो आणि तुम्हीही त्याच्या प्रेमात पडता, हा त्या पुरुषाचा दोष नाही असं म्हणतात. अशा परिस्थितीत लोक नेहमीच महिलांना दोष देण्याचे मार्ग शोधत असतात. बलात्कार पीडितांच्याच बाबतीत पाहा, अशा घटना घडल्यानंतर त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्यासाठी किंवा रात्री उशिरा बाहेर राहण्यासाठी दोष दिला जातो. ही सर्व चुकीच्या मानसिकतेची लक्षणे आहेत,” असं कंगना रणौत म्हणाली.
कास्टिंग काउचबद्दल कंगना रणौतचं वक्तव्य
चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउचसारखे प्रकार घडतात. या काळ्या बाजूबद्दल बोलताना कंगना म्हणाली, “मलाही कास्टिंग काउचसाठी बोलावण्यात आलं होतं. ही फिल्म इंडस्ट्री प्रचंड घाणेरडी आहे. आणि इंडस्ट्रीतील आउटसायडर्ससाठी ती खूपच निर्दयी आहे. ‘मी टू’ मोहिमेदरम्यान मी याबद्दल खूप उघडपणे आणि सविस्तर बोलले होते.”
आउटसायडर्सचे इंडस्ट्रीत होते शोषण
“आउटसायडर्सचे इंडस्ट्रीत खूप शोषण केले जाते. लोखंडवालात असे प्रकार प्रचंड घडतात. मीही ऑडिशनसाठी अशा बऱ्याच ठिकाणी गेले आहे. पण मी नशीबवान होते की मला माझ्या आयुष्याच्या सुरुवातीलाच ब्रेक मिळाला. असे बरेच लोक आहेत जे अजूनही तिथे भटकत आहेत आणि संधी मिळावी यासाठी स्वतःची ओळख गमावून बसले आहेत,” असं मत कंगनाने व्यक्त केलं.
अभिनेते महिलांशी कसे वागतात, याबद्दल कंगनाने तिचं मत मांडलं. “मी जास्त हिरोंबरोबर काम केलेलं नाही, पण हिरो खूपच असभ्य वागतात,” असं कंगना म्हणाली. दरम्यान, कंगना रणौत शेवटची ‘इमर्जन्सी’ सिनेमात दिसली होती. हा तिने दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. हा बायोपिक बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
कंगना रणौत लवकरच एएल विजय दिग्दर्शित एका सायकोलॉजिकल-थ्रिलर सिनेमात दिसणार आहे. नाव न ठरलेल्या या चित्रपटात अभिनेता आर माधवनची वर्णी लागली आहे.