अभिनेत्री कंगना रणौतने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला मुंबईतील तिच्या पाडलेल्या मालमत्तेची कोणतीही भरपाई मिळाली नाही. सप्टेंबर २०२० मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाली हिल, वांद्रे येथील तिची मालमत्ता पाडली होती. अनधिकृत बांधकामाचे कारण देत हे बांधकाम पाडण्यात आले होते.
‘एबीपी’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “मला आतापर्यंत कोणतीही भरपाई मिळालेली नाही, ते मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवणार होते. म्हणून, मी महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि म्हणाले, ‘तुम्ही लोक त्याचं मुल्यांकन करून पाठवून द्या. ज्यांनी करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केला, असे लोक मला नको आहेत. तसेच मला नुकसान भरपाई देखील नको आहे. न्यायालयाने सांगितले आहे की त्यांनी मला भरपाई द्यावी, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी कधीही मूल्यांकनासाठी लोक पाठवले नाहीत आणि मी पाठवा असंही म्हटलं नाही. कारण मला माहीत आहे की ते करदात्यांचे पैसे आहेत आणि मला करदात्यांचे पैसे नको आहे.”
दरम्यान, २०२० मध्ये कंगना हिमाचल प्रदेशातून मुंबईत आली होती व त्याच दिवशी शिवसेनेबरोबर तिचा वाद झाला. त्यानंतर तिच्या अनधिकृत बांधकाम असल्याचं म्हणत तिच्या संपत्तीवर कारवाई करण्यात आली होती. मालमत्ता पाडल्यानंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्या कारवाईवर स्थगिती आदेश मिळवला. एका याचिकेत कंगनाने तिचा बंगला बेकायदेशीरपणे पाडण्यात आल्याचे कारण देत बीएमसीकडून २ कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही केली होती.